गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव हे सण आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. न्यायालयांनी याबाबतीत हस्तक्षेप करून लक्ष्मणरेषा ओलांडू नये, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. दहीहंडी उत्सवावरील सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधाविरोधात जनतेच्या असंतोषाचे नेतृत्व करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून पक्षाची भूमिका मांडण्यात आली. गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव आदी सर्व आमच्या श्रद्धेचे विषय आहेत. तेव्हा ‘राज्यकारभार’ करणार्‍या न्यायालयांनी निदान याबाबतीत तरी लक्ष्मणरेषा ओलांडू नये. लोकांनी त्यांचे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यांना काम करू द्या. भलेबुरे कळण्याइतपत डोके सरकारच्या मानेवर आहे. हे डोके उडवून लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केलाच तर राष्ट्रीय व्यवस्थेचे सर्व थर कोसळतील. हिंदूंचे सण-उत्सव होणारच. ते रोखण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व शिवसेना त्या असंतोषाचे नेतृत्व करेल, असे या अग्रलेखात म्हटले आहे.
दहीहंडीसह इतर सर्वच सण आणि उत्सवांच्या निमित्ताने न्यायालये जे ‘फतवे’ काढत आहेत त्यामुळे जनतेत संताप आहे. एक प्रकारची अस्वस्थता आहे व या असंतोषाचा स्फोट होऊन ‘न्यायालयास डोके आहे काय?’ असा सवाल विचारीत संतप्त जनता रस्त्यावर उतरू शकते, असा इशाराही या अग्रलेखातून देण्यात आला आहे.
चोर्‍या व खुनांचे प्रकार थांबत नाहीत. महिलांवरील बलात्कार व अत्याचार सुन्न करीत आहेत. राज्यव्यवस्था व कायदे-कानून जागेवर असताना हे सर्व घडत आहेच ना? इमारती कोसळत आहेत. पूल पडत आहेत. भ्रष्टाचार व अतिरेक्यांची खुनी होळी सुरूच आहे. जन्मठेप व फाशीसारख्या शिक्षा असूनही निर्घृण गुन्हे होण्याचे थांबत नाही व टेबलावर ‘ऑर्डर ऑर्डर’ असे आपटून हातोडे झिजले तरी गुन्हेगारांचे आक्रमण थांबत नाही. प्रत्यक्ष न्यायालयात उंबरठे झिजवून तरी खरा न्याय मिळतोय का, हा सवालच आहे , असा खोचक टोला सेनेकडून न्यायव्यवस्थेला लगावण्यात आला आहे.

दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी करणे अशक्य- उद्धव ठाकरे</strong>
दहीहंडीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अशक्य असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख यांनी शनिवारी पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयावर तोफ डागली. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. न्यायालयाकडून घालण्यात आलेली ध्वनिमर्यादा पाहता नवरात्रीचे नाव नवदिवस ठेवले पाहिजे, अशी खोचक टिप्पणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच न्याायालय फक्त हिंदूंच्या सणावरच निर्बंध का घालते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दहीहंडीचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अशक्य आहे. मात्र, दहीहंडी उत्सवात १८ वर्षांखालील मुलांच्या सहभागावर कोर्टाकडून घालण्यात आलेल्या बंदीची अट मान्य असल्याचे उद्धव यांनी सांगितले.