scorecardresearch

दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट ; रुग्णसंख्येच्या आलेखात वेगाने घसरण, मुंबईतील बाधितांचे प्रमाण ३ टक्के

जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ातही रुग्णवाढीचा आलेख खाली आल्याने रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत कमी झाली.

मुंबई : मुंबईत करोनाच्या तिसऱ्या लाटेचा जोर ओसरत चालला असून महिनाभरातच दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख दोन हजारांच्या खाली आला आहे. बाधितांचे प्रमाणही आता ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग प्रसार २१ डिसेंबरपासून वेगाने वाढायला सुरुवात झाली, तसा रुग्णसंख्या वाढीचा आलेखही झपाटय़ाने वर जाऊ लागला. ३१ डिसेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी तीन दिवसांपर्यंत खाली आला, दैनंदिन रुग्ण संख्या पाच हजारांवर गेली. जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात तिसरी लाट शिखरावर पोहोचली. या काळात दैनंदिन रुग्णसंख्या सुमारे २० हजारांपर्यंत गेली. त्यानंतर मात्र दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख ज्या वेगाने वर गेला, त्याच वेगाने खाली आला. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ातच दैनंदिन रुग्णसंख्येत जवळपास निम्म्याने घट होऊन दहा हजारांवर आली.

जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ातही रुग्णवाढीचा आलेख खाली आल्याने रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत कमी झाली. मागील चार ते पाच दिवसांमध्ये यात आणखी घट झाली असून आता दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्याही खाली गेली आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या काळात दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांवर गेली होती आणि या महिन्यात उत्तरार्धात पुन्हा दोन हजारांच्या खाली गेली आहे. त्यामुळे एकूणच तिसऱ्या लाटेचा जोर महिनाभरातच कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

करोनामुक्तांच्या प्रमाणात वाढ

तिसरी लाट शिखरावर गेली त्यावेळी शहरात एक लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन होते. रुग्णसंख्या वेगाने वाढली तरी रुग्ण तीन ते चार दिवसांमध्ये बरे होत असल्यामुळे बाधित रुग्ण वेगाने करोनामुक्त होत आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही वेगाने घट झाली आहे. या उपचाराधीन रुग्णांची संख्या सुमारे २२ हजारांपर्यंत खाली आली आहे. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात मुंबईत बाधितांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली होते. जानेवारीमध्ये संसर्ग प्रसार वेगाने वाढल्यामुळे लाट शिखरावर गेली. त्यावेळी बाधितांचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांवर गेले होते. गेल्या आठवडाभरात बाधितांचे प्रमाण वेगाने कमी होऊन आता तीन टक्क्यांपर्यंत घटले आहे.

चाचण्यांची संख्या  ५० हजारांखाली

मागील आठवडाभरात चाचण्यांमध्येही मोठय़ा प्रमाणात घट झाली असून दैनंदिन चाचण्यांची संख्या ५० हजारांच्याही खाली गेली आहे. मागील दोन दिवसांत तर दैनंदिन चाचण्यांची संख्या सुमारे ४२ हजारावर आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Covid 3rd wave in mumbai third wave of covid 19 graph in mumbai decreasing zws

ताज्या बातम्या