काळजी घ्या! कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एका दिवसात ५९५ रूग्ण आढळले

उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ४३१२ झाली आहे

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत करोना संसर्गामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. आता तर ही संख्या ५०० चा आकडा पार करताना दिसत आहे. तरीही अनेक नागरिक मुखपट्टी न वापरता रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. बाजारांमध्ये खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. शासनाने केलेल्या नियमांना तर कोणी जुमानताना दिसत नाही. ताप, सर्दी असलेल्या तसेच करोना संशयित रुग्णांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात प्रतिजन चाचण्या करण्यासाठी पाठविण्याच्या सूचना प्रशासनाने खासगी डॉक्टर, रुग्णालय चालकांना दिल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज एकूण ५९५ रूग्ण आढळून आले त्यामुळे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या ४३१२ झाली आहे. आजच्या दिवसात बरे होवून घरी परतणाऱ्या रूग्णांची संख्या २०८ होती त्यामुळे एकूण डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या ६३७९७ इतकी झाली आहे. महापालिका क्षेत्रात आज एका मृत्यूची नोंद झाली.
आज आढळलेल्या रूग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे,

कल्याण पूर्व – ९२
डोंबिवली पूर्व – १९०
मांडा टिटवाळा – ३७
कल्याण पश्चिम – १८१
डोंबिवली पश्चिम – ८९
मोहना – ०६

कठोर निर्बंध

कल्याण-डोंबिवली शहरात रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेने कठोर निर्बंध उचलले आहेतच. त्यानुसार उपाहारगृह, स्वागतिका, मंगल कार्यालये सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रम, विवाह सोहळे, त्यामधील हळदीचे कार्यक्रम रात्री नऊ वाजेच्या आत उरकण्यात अनिवार्य आहे. हे कार्यक्रम करण्यापूर्वी प्रभाग अधिकारी, पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वधू-वर पिता, मंगल कार्यालय व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. घरपोच सेवा देणारी व्यवस्था रात्री १० वाजेपर्यंत काम करतील. अत्यावश्यक सेवेचे व्यवहार नियमित सुरू राहतील. मुखपट्टी वापरणे अनिवार्य आहे. करोना नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Covid patients number crosses 500 mark in kalyan dombivali area sbi