मुंबई : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आणि त्यांची पत्नी यांच्यासह सहा जणांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरीमधील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर, तसेच, तेथे हॉटेल बांधताना तथ्य लपवल्याचा आरोप रवींद्र वायकरांसह इतर आरोपींवर करण्यात आला आहे. महापालिकेचे उपअभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र वायकर, पत्नी मनीषा वायकर, त्यांचे व्यावसायिक भागीदार आसू नेहलनाई, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि लेखापाल अरुण दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील व्यारवली येथील आठ हजार चौ. मी. क्षेत्रफळाच्या राखीव भूखंडाबाबतची माहिती लपवून जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत तारांकित हॉटेलच्या बांधकामासाठी फसवणुकीने परवानगी मिळविली, तसेच महानगरपालिकेने मनोरंजन व क्रीडा उपक्रमांसाठी राखीव केलेल्या भूखंडाचा लग्न, पार्टी व अन्य कार्यक्रमांकरिता व्यावसायिक वापर करून कोटय़वधींचा लाभ घेतल्याचा आरोप तक्रारीत आहे.