scorecardresearch

सरकार आक्रमक; राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा; हजारो मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा

मशिदींवरील भोंगे हटविले नाही तर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतली.

मुंबई, औरंगाबाद : मशिदींवरील भोंगे हटविले नाही तर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा कार्यकर्त्यांना आदेश देणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घेतली. औरंगाबादच्या सभेत दोन समाजात तेढ निर्माण करणारे भाषण केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या.

राज ठाकरे यांच्या आवाहनानुसार बुधवारपासून मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे. महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील काही विधानांवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन समूहांत तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषण, अटी शर्थीचा भंग केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेच्या १५० पेक्षा अधिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, दृक्श्राव्य माध्यमांतून राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भाषणांना सायबर पोलीस ठाण्यातून तपासणी, अवलोकन करूनच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

औरंगाबादमध्येही सतर्कता..

शहरात कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून औरंगाबाद पोलिसांनी कठोर बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ४५ ठिकाणी मंदिरे व मशिदीतील अंतर कमी आहे. औरंगाबाद शहरात १,०४८ मंदिरे व ४२० मशिदी आहेत. या प्रार्थनास्थळावर करडी नजर असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांनी सांगितले.

नोटिसा आणि पोलीस कुमक..

राज्यभरात १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर १३ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दोन लाख अधिक पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या ८७ कंपन्या आणि ३० हजार गृहरक्षक सतर्क ठेवण्यात आले आहेत.

कोणत्याही प्रकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी पोलीस सज्ज आहेत.

– रजनीश सेठ, राज्याचे पोलीस महासंचालक

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crime raj thackeray notice thousands mns workers government aggressive ysh

ताज्या बातम्या