मुंबई: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे पाटबंधारे विभागाची पोटपाटलगतची जागा तुकडा बंदी कायद्याचे भंग करून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी विधान परिषदेत दिली.
शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला पाटबंधारे विभागाच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याची बाब समोर आणली. शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडला असून, प्रांत कार्यालयात एजंटच्या माध्यमातून जमीन विक्रीचा व्यवहार झाल्याचा आरोप शिंदे यांनी केला. मंत्री बावनकुळे यांनी घोटाळा झाल्याचे यावेळी कबूल केले. ते म्हणाले की, या प्रकरणात तुकडा बंदी कायद्यात पूर्णपणे भंग झाला आहे. अधिकार नसताना कायद्याला गुंडाळून टाकले. कायद्याचे धाक नसलेले हे प्रकरण आहे. अधिकाऱ्यांची यादी यात मोठी असून या प्रक्रियेत अनेक एजंटही सामील आहेत. विकास आराखडा मंजूर नसतानाही, एजंटांच्या माध्यमातून यात बदल सुचवण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी दलालांशी संगनमत करून हरितपट्ट्यातील जमिनींचे यलो झोनमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला. अनेक चुका या प्रकरणात केल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यात येतील. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा भंग केला आहे त्यांच्यावर विभागीय चौकशी करून फौजदारी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.