येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्रिपद सोडण्याची चूक पुन्हा करणार नाही, असे सांगत मुख्यमंत्रिपदाचे आपले स्वप्न एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना जाहीरपणे गोंजारणाऱ्या अजित पवार यांचा शनिवारी शिवसेनेबरोबरच, राष्ट्रवादीचा सत्तेतील भागीदार असलेल्या काँग्रेसनेही जोरदार समाचार घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा आगामी निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा सर्वपक्षीय शत्रू असेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
सन २००४ मध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. त्यानंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. त्यामुळे २००४ मध्ये मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला ही चूक झाल्याची खंत अजित पवार यांच्या वक्तव्यातून वारंवार व्यक्त होत असते. आता २०१४ च्या निवडणुकीत या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीकडेच मुख्यमंत्रिपद राहील, असे जाहीर करून आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच पहिला सामना होणार असल्याचे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले आहेत.
पवार यांच्या या वक्तव्यावर लगेचच शिवसेना आणि काँग्रेसमध्येही तिखट प्रतिक्रिया उमटल्या. भावी मुख्यमंत्रिपदावरील दावा हे अजित पवारांचे दिवास्वप्न आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची खिल्ली उडविली, तर मुख्यमंत्री होण्यासाठी जनसंपर्क लागतो, लोकांच्यात जावे लागते, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पवार यांच्याबरोबरच पक्षांतर्गत विरोधकांनाही टोला लगावला. ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी तर आपल्या दौऱ्यात जागोजागी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांनाच लक्ष्य केले. आता मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने अजित पवार हे काँग्रेसचेही लक्ष्य ठरतील, असे संकेत मिळत
आहेत.
हे तर ‘दिवास्वप्न’
‘अजित पवार यांच्या डोक्यावर दिवा असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचे ‘दिवास्वप्न’ पडत असावे, परंतु ज्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न आपण पाहत आहोत त्या राज्यासाठी आपण काय केले, याचे उत्तरही त्यांना द्यावे लागेल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.