सुशांत मोरे

मध्य रेल्वेवर ११० ठिकाणी रूळ ओलांडणी; तुर्भे, दादर, कुर्ला परिसरात प्रमाण जास्त

घाईच्या वेळेत जलदगतीने रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांनीच तयार केलेले जवळचे मार्ग (शॉर्टकट) जीवघेणे ठरत असतानाही रेल्वे प्रशासनाने ते बंद करण्याबाबत गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. प्रशासनाच्याच पाहणीत मध्य रेल्वे मार्गावर १३९ धोकादायक ‘शॉर्टकट’ आढळल्यानंतर त्यापैकी २९ मार्ग बंद करण्यात आले, परंतु अजूनही १००हून अधिक ठिकाणी प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करत आहेत. तुर्भे, भायखळा, दादर, कुर्लापाठोपाठ कल्याण, डोंबिवली, बदलापूर, पनवेलमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूळ ओलांडू नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने केले जाते. तरीही काही प्रवासी हा धोका पत्करतात व लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसच्या धडकेत जीव गमावतात. अशाप्रकारे मृत्युमुखी पडणाऱ्या किंवा जबर जखमी होणाऱ्या प्रवाशांची वार्षिक संख्या हजारांत आहे. मात्र तरीही प्रवाशांचे रूळ ओलांडणे सुरूच असते. रेल्वेने रुळांशेजारी उभारलेली संरक्षक भिंत वा लोखंडी जाळी तोडून नवीन शॉर्टकट बनवले जातात. रेल्वे सुरक्षा दलाकडून दररोज कारवाईचा बडगादेखील उचलण्यात येत आहे. यात मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग व हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर १३९ शॉर्टकटचे मार्ग असल्याचे निदर्शनास आले. आतापर्यंत २९ शॉर्टकट बंद केले आहेत. तरीही तुर्भे येथे सर्वाधिक २१ मार्ग असून त्यापाठोपाठ कुर्ला येथे १३ शॉर्टकटचे आहेत. दादरमध्ये तर १० मार्ग असून भायखळात १३ शॉर्टकटचे मार्ग आहेत. तर अन्य स्थानकांतही काही छुपे मार्ग असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले. या भागांत रूळ ओलांडण्याचे प्रमाण हे जास्त आहे. रूळ ओलांडणाऱ्यांवर काय उपाय  करता येतील याचा विचार करण्यात येत आहे. २९ मार्ग बंद केले आहेत, असे  मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले.

कारवाईचा बडगा

स्थानक हद्द     कारवाई

भायखळा       ६१

दादर          ४४

कुर्ला          ७५

ठाणे           ५८

दिवा          १७३

डोंबिवली        १९६

कल्याण        २३७

बदलापूर        २१३

वडाळा         ५४

तुर्भे           २६

पनवेल       ९९

(फेब्रुवारी २०१९मधील आकडेवारी)