खाद्यपदार्थाच्या दुकानाच्या काही अनधिकृत भागावर निष्कासनाची कारवाई न करण्याकरिता अडीच लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या पालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागाचा कनिष्ठ अभियंता सुयोग जाखडी याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.
तक्रारदाराचे कुर्ला पश्चिम येथे खाद्यपदार्थाचे दुकान आहे. मात्र दुकानाचा काही भाग पदपथावर अतिक्रमण करून बांधण्यात आलेला आहे. परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या मोहिमेदरम्यान जाखडी यांने तक्रारदाराला दुकानावर कारवाई होऊ नये असे वाटत असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे धमकावले. त्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात तक्रारदाराने लाचेची ही रक्कम जाखडी याला दिली. त्यानंतरही तक्रारदाराला कारवाईबाबतची नव्याने नोटीस पाठविण्यात आली. त्यामुळे तक्रारदाराने जाखडी यांची कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्या वेळी जाखडी याने तक्रारदाराकडे कारवाई न करण्याकरिता चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. एवढे पैसे आपण देऊ शकत नसल्याचे तक्रारदारांनी सांगितल्यावर अखेर जाखडी याने सव्वा लाख रुपये देण्यास सांगितले. ही मागणी मान्य करून तक्रारदाराने जाखडी याला सुरुवातीला सव्वालाख रुपयांपैकी ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. मात्र लाचेची ही रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने लाचलुचत प्रतिबंधक विभागात जाखडी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवर कारवाई करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाखडी याला तक्रादाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.