मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर शनिवारी व रविवारी केलेल्या दोन कारवायांमध्ये पाच किलो २०० ग्रॅ्म हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सव्वा पाच कोटी रुपये असून या कारवाईत गुजरात व दिल्लीतील दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून सीमाशुल्क विभाग इतर आरोपींचा शोध घेत आहे.
बँकॉकहून येणाऱ्या एका प्रवाशाकडे अमली पदार्थ असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी गुजरातमधील रहिवासी असलेल्या हार्दिक बदानी (२४) याला अडवले. त्यावेळी त्याच्याकडील बॅगेमध्ये सहा पाकिटे सापडली. त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ होता. सीमाशुल्क विभागाने फिल्ड किटने तपासणी केली असता तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत त्याच्याकडे २८७३ ग्रॅम गांजा सापडला आहे. त्याची किंमत २ कोटी ८७ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. आरोपीला गांजा तस्करीसाठी काही रक्कम मिळणार होती. पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली. याप्रकरणी सीमाशुल्क विभाग अधिक तपास करत आहे.
दुसऱ्या कारवाईत सीमाशुल्क विभागाने गांजाच्या तस्करीप्रकरणी मोहम्मद सामी(२३) या दिल्लीतील रहिवाशाला रविवारी अटक केली. सामीही बँकॉकहून मुंबई विमानतळावर आला होता. त्यावेळी रविवारी संशयावरून त्याला अडवण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडील काळा रंगाच्या बॅगेत काही संशयास्पद वस्तू असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पंचांच्या समक्ष तपासणी केली असता त्यात खाद्य पदार्थांच्या पाकिटांसोबत ठेवण्यात आलेल्या पाकिटांमध्ये हिरव्या रंगाचा पदार्थ सापडला. त्याची तपासणी केल्यानंतर तो हाड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून २३३४ ग्रॅम गांजा सापडला आहे. त्याची किंमत २ कोटी ३३ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार सीमाशुल्क विभागाने याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीकडील गांजा जप्त केला. तसेच याप्रकरणी आरोपी मोहम्मद सामीलाही अटक करण्यात आली.
पर्यटनाच्या नावाखाली गांजा तस्करी
दक्षिण अमेरिका खंडातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची निर्मिती करण्यात येते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्गे मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात विमानांची ये-जा असते. परिणामी, बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी करण्यात येत आहे. ६ महिन्यात १०० कोटींहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या तस्करीत थायलंडमधील भारतीय तस्करांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे.