मुंबई : बँकॉक येथून तस्करी करून मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणलेले ३६ विदेशी सरडे सीमा शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यापैकी आठ सरड्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, तस्करी केल्याप्रकरणी एका संशयितीला अटक करण्यात आली आहे.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी उतरलेल्या एका प्रवाशाचे सामान संशयास्पद आढळल्याने त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली.
सामानात लपवून ठेवलेले ३६ दुर्मिळ विदेशी सरडे सापडले. यामध्ये ६ इग्वाना आणि ३० ऑरेंज-बीअर्ड ड्रॅगन यांचा समावेश होता. या सरड्यांची बॅंकॉकहून तस्करी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सीमा शुल्क विभाग, वाईल्ड लाईफ क्राइम कंट्रोल ब्युरो, वन विभाग आणि रेस्किंग असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेल्फेअर (रॉ) यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत या सरड्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मोमिन शेखला अटक करण्यात आली. दरम्यान, ३६ पैकी २ ऑरेंज-बीअर्ड ड्रॅगन आणि ६ इग्वाना यांचा मृत्यू झाला आहे. जीवदान मिळालेल्यापैकी काही सरड्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
ऑरेंज-बीअर्ड ड्रॅगन आकर्षक सरडा
ऑरेंज-बीअर्ड ड्रॅगन हे त्यांच्या रंगामुळे आकर्षक दिसतात. दीड ते दोन फूट लांब असणाऱ्या या सरड्याचे आयुर्मान १० ते १५ वर्षे असते. कीटक, भाज्या व फळे हा त्यांचा आहार असतो. त्यांचा रंग आणि हातळण्यास सोपे असल्यामुळे अनेकदा त्यांना घरात पाळले जाते. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.