रेल्वे कायद्यातील दुर्मीळ कलमाअंतर्गत शिक्षा

मुंबई : रेल्वे रुळावर कुंपण टाकणे ही कृतीच प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी पुरेशी असल्याचे निरीक्षण नोंदवून सत्र न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आणि त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावली. या प्रकरणी न्यायालयाने भारतीय रेल्वे कायद्यांतील एका दुर्मीळ कलमाचा वापर करून आरोपींना दोषी ठरवले.

गौतम पटेल (२६) आणि महमूद शेख (३३) या दोघांनी २०१८ मध्ये चर्चगेट आणि मरिन लाइन्स दरम्यानच्या रेल्वे रुळांवर ७२० रुपये किमतीचे कुंपण कापले. तसेच मरिन लाइन्स येथे फलाटावर गस्त घालणाऱ्या रेल्वे पोलिसाच्या नजरेस पडल्यावर रुळावर कापलेले कुंपण टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला, असा त्यांच्यावर आरोप होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींचा रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आणण्याचा हेतू होता हे दाखविणारा कोणताही पुरावा नसला तरी, कुंपणाचा जड तुकडा रुळावर ठेवल्यास प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येईल याबाबत आरोपी अनभिज्ञ होते हे मान्य करता येऊ शकत नाही. आपल्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना आरोपींना होती. त्यामुळे आरोपींना त्यांच्या कृतीसाठी दोषी ठरवायला पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले. कारावासात असल्याने शिक्षेचा कालावधी त्यांनी आधीच भोगला असल्याचे न्यायालयाने म्हटले.