मुंबई : अमेरिकेत असलेल्या भावाचा हुबेहूब आवाज काढून एका व्यापाऱ्याला सायबर भामट्याने फसविले आहे. आजारी असल्याचे कारण देत तातडीने पैसे पाठविण्यास या भामट्याने सांगितले होते. कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) च्या मदतीने आवाज क्लोन करून ही फसवणूक करण्यात आली होती. जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ५६ वर्षांचे असून त्यांचा प्लास्टीकचा कारखाना आहे. ते जुहू परिसरात पत्नीसह राहतात. त्यांची दोन मुले परदेशात शिक्षणासाठी गेले आहेत. २९ जुलै रोजी ते घरी असताना त्यांना अमेरिकेतील एका क्रमांकावरून फोन आला. ज्या क्रमांकाने फोन आला होता त्या क्रमांकाच्या प्रोफाईल फोटो मध्ये फिर्यादी यांच्या भावाचे छायाचित्र होते. मी आजारी असून तात्काळ ५० हजार रुपये पाठव असे त्या व्यक्तीने सांगितले. आवाजही फिर्यादी यांच्या भावासारखा होता. त्यामुळे हा फोन आपल्या भावानेच दुसर्या क्रमांकावरून केला असा फिर्यादी यांचा समज झाला होता. फिर्यादी यांनी गुगल पेद्वारे पैसे पाठविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते पैसे गेले नाहीत. तेव्हा त्या भामट्याने एका बँक खात्याचा नंबर दिला. त्यावर फिर्यादीने ५० हजार रुपये पाठवले.
दुसऱ्यांदा पैसै मागितल्यावर संशय आला
काही वेळाने पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला आणि त्याने पुन्हा ५० हजार रुपये त्या बँक खात्यात पाठविण्यास सांगितले. यावेळी मात्र फिर्यादी यांना संशय आला. त्यांनी भावाच्या मूळ मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. माझी तब्येत ठणठणीत आहे, मी कॉल केला नव्हता असे त्यांच्या भावाने सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याच्या लक्षात आले. या प्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (क), ६६ (ड) तसेच फसवणुक प्रकरणी कलम ३१८ (४) आणि ३१९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हुबेहू आवाज काढण्याचे तंत्रज्ञान काय आहे?
कृत्रिम तंत्रत्रानाच्या मदतीने हुबेहून आवाज काढून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याचा नमुना (ऑडियो सॅम्पल) घेतला जातो, आणि त्यावर एआय आधारित मॉडेल्स प्रशिक्षण घेतात. काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंतचा ऑडिओ त्यासाठी पुरेसा ठरतो. एकदा आवाज ‘क्लोन’ केला की, त्याच आवाजात काहीही नवीन वाक्य टाइप करून बोलवता येते. ज्यामुळे जणू ती व्यक्तीच बोलत आहे असा भास होतो. यात एखाद्याचा आवाज इतका हुबेहू तयार केला जातो की, खरी व्यक्तीच बोलते आहे असा भास होतो, असे पोलिसांनी सांगितले. एखाद्याच्या नातेवाईकाचा हुबेहू आवाज वापरून पैसे मागणे, प्रसिद्ध व्यक्तींचा आवाज वापरून खोटी विधाने पसरवणे, एखादी क्लिप तयार करून बदनामी करणे असे प्रकार केले जातात. बँक आणि तत्सम ठिकाणी आर्थिक फसणूक करण्यासाठी एआय क्लोन केलेला आवाज वापरून बोलून ओळख पटवली जाते.