मुंबई : शालार्थ ओळख क्रमांक देण्यास शिक्षकांना वेठीस धरणे, बनावट शालार्थ क्रमांक देणे, नियमबाह्य पद्धतीने शाळांना मंजुरी देणे, आदी प्रकरणी मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांच्या निलंबनाची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. भाजपचे संजय उपाध्याय यांनी याप्रकरणी लक्षवेधी सादर केली होती.
शालार्थ क्रमांकासाठी आलेल्या शिक्षकांच्या फाईल वर्षानुवर्षे संगवे यांनी प्रलंबित ठेवल्या आहेत. शेकडो शिक्षकांना जुन्या तारखांचे शालार्थ क्रमांक संगवे यांनी दिले आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना सेवाज्येष्ठता डावलून आदेश काढण्यात आले. रात्रशाळेसंदर्भात शासनाचे स्वतंत्र धोरण नसताना संगवे यांनी धोरण निश्चित केले. त्यामुळे अनेक शिक्षक दोन ठिकाणी कामे करीत असून दोन ठिकाणचे पगार घेत असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला.
याप्रकरणी संगवे यांची चौकशी केली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सभागृहात सांगितले. मात्र सत्ताधारी सदस्यांनी चौकशी नको, थेट निलंबन करा, अशी मागणी केली. संगवे यांनी नियमबाह्य कामांमध्ये मोठे अर्थपूर्ण व्यवहार केले असून त्यांना सरकार पाठिशी का घालत आहे, असा सवाल सदस्यांनी भुसे यांना केला. यावेळी सत्ताधारी बाकावरचे सदस्य उभे होते आणि निलंबनाची मागणी करत होते.
बनावट शालार्थ क्रमांक प्रकरणी विभागाने भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचे विशेष चौकशी पथक नेमले आहे, त्याअंतर्गत संगवे यांची चौकशी होईल, असे मंत्री भुसे म्हणाले. परंतु, सदस्य निलंबनाच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर गोंधळ वाढत गेल्याने आठ दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करीत संगवे यांचे निलंबन केले जाईल, असे भुसे यांनी जाहीर केले. या लक्षवेधीच्या चर्चेत वरुण सरदेसाई, गोपीचंद पडळकर, विक्रम सावरकर आदींनी भाग घेतला.