महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्ववादाच्या भूमिकेबद्दल अधिक आक्रमक झाल्यानंतर आता शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या दादरमध्ये राज ठाकरेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आलीय. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ईदचा म्हणजेच ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिलं आहे. असं न झाल्यास मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावणार असल्याचं राज यांनी स्पष्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दादरमध्ये राज ठाकरेंनी मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलेला जुना फोटो असणारे बॅनर्स झळकले आहेत.
नक्की वाचा >> “बाळासाहेब, आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदू असून…”; मनसेची शिवसेना भवनासमोरच बॅनरबाजी
दादरमध्ये झळकावण्यात आलेल्या या बॅनरवर राज ठाकरेंचा एक जुना फोटो आहे. या फोटोमध्ये राज यांनी डोक्यावर मुस्लिमांप्रमाणे गोल टोपी घातलीय. खांद्यावर कापड घेतलं असून त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. हाच फोटो या बॅनरवर वापरण्यात आलाय. या फोटोच्या वर ‘काल’ असं लिहिलं असून ही राज यांची कालची भूमिका होती असं सूचित केलंय.
मध्यभागी भगव्या रंगाच्या आयतामध्ये ‘हनुमान’ असं लिहिलं आहे. तर बाजूला चार प्रश्नचिन्हं छापण्यात आली असून त्यावर ‘उद्या’ असं लिहिण्यात आलंय. कालपर्यंत राज यांचा मुस्लिमांना पाठिंबा होता. आज ते हनुमानाचं नाव घेत आहेत तर उद्या काय करतील याबद्दल प्रश्नच आहे, अशा अर्थाने हा बॅनर लावण्यात आलाय.

दादरमध्ये हे बॅनर नेमके कोणी लावले यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वीच मनसेने शिवसेना भवनासमोर बाळासाहेब, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो असणारे बॅनर लावून हनुमान चालीसावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी असंही या बॅनरमध्ये म्हटलं होतं.