Mumbai Dahi Handi 2025 Celebration : राज्यासह मुंबईत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध भागातील गोविंदा पथके कच्छी बाजा, तसेच बँजोच्या तालावर दहीहंडी उत्सवासाठी रवाना झाली आहेत. या धामधुमीत दादरमधील प्रसिद्ध आयडियल बुक डेपोजवळील दहीहंडी उत्सवात मालाड (पूर्व) परिसरातील शिवसागर गोविंदा पथकाने तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे ‘छावा’ थर पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दहीहंडी उत्सवाच्या धामधुमीत परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने काही गोविंदा पथकांकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण करण्यासह सामाजिक संदेशही दिले जातात. या अनुषंगाने यंदा मालाड (पूर्व) परिसरातील शिवसागर गोविंदा पथकाने तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलिदानापर्यंतचा इतिहास मांडला आहे. तसेच विविध महत्वाचे प्रसंगही दाखविण्यात आले. या देखाव्यात एक गोविंदा छत्रपती संभाजी महाराज तर काही गोविंदा मावळ्यांच्या रूपात होते. याप्रसंगी छत्रपती संभाजी महाराज की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
दरम्यान, दरवर्षी शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले जाते. सद्यस्थिती मांडून विविध सामाजिक विषयांवरही भाष्य करणारे, ऐतिहासिक प्रसंगांवरील देखावे सादर केले जातात. या गोविंदा पथकाने गेल्या काही वर्षात सध्याच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे योगदान समजण्यासाठी ‘गड आला पण सिंह गेला’, महिला सबलीकरण आणि अफजलखानाचा वध हा देखावा तीन थर रचून चौथ्या थरावर सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या अनुषंगाने आजच्या पिढीला आणि विशेषतः शालेय व महाविद्यालयांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी यंदा शिवसागर गोविंदा पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास दाखविण्यात आला.
‘दरवर्षी उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत मानवी मनोरा रचनेत देखावा सादर करून सामाजिक संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो. यंदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा तीन थर रचून चौथ्या थरावर दाखविण्यात आली. हा देखावा माझ्यासह किशोर कदम, संदीप कोळप आदी मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला. आमच्या गोविंदा पथकात ३५० जण असून गेल्या दीड महिन्यापासून सराव सुरू होता’, असे शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक प्रतीक बबन बोभाटे यांनी सांगितले.