‘दाजिबा गर्ल’ आज ‘व्हिवा लाऊंज’मध्ये
‘ऐका दाजिबा’ अशी हाक देत गायनक्षेत्रातून घराघरापर्यंत पोहोचलेली वैशाली सामंत म्हणजे हसतमुख चेहरा, मनमोकळा सूर आणि दिलखुलास स्वभावाचे एक मिश्रणच. गायिका म्हणून मराठी चित्रपट संगीतक्षेत्रात अगदी थोडय़ा कालावधीत वैशालीने आपला ठसा उमटवला. मात्र तिथवरच न थांबता हिंदीतही तिने भरारी घेतली. गायिका, संगीतकार म्हणून आपल्या आवडत्या क्षेत्रात जम बसवल्यानंतर एक उद्योजिका म्हणूनही तिने आपला ‘बँड्र’ निर्माण केला आहे. अशा या गुणवान गायिकेचा चौफेर प्रवास जाणून घेण्याची संधी ‘केसरी टुर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्क येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे सायंकाळी ४.४५ वाजता वैशालीसोबतच्या गप्पांची ही मैफिल सुरू होईल. आपल्या कर्तबगारीने दुसऱ्यांसाठी आदर्श उदाहरण घालून देणाऱ्या, स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या अशा नानाविध क्षेत्रातील मान्यवर महिलांची यशोगाथा ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून उलगडली आहे. यंदाच्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये खुद्द वैशालीच्या तोंडून तिच्या यशाची सुरेल कहाणी ऐकायला मिळणार आहे.
‘ऐका दाजिबा’ या तिच्या पहिल्याच गाण्यातून तिने गायिका म्हणून दमदार पदार्पण केले. चित्रपटांमधून पाश्र्वगायन करण्यातच एक पिढी रमलेली असताना वैशालीने मात्र आपली स्वरसाधना तिथेच थांबवली नाही. मराठी-हिंदी चित्रपटांमधून गाणी गातानाच तिने ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून आपली सुरूवात केली. ‘कोंबडी पळाली’, ‘ढगाला लागली कळ’, ‘डिपाडी डिपांग’ पासून ते अगदी अलिकडच्या ‘तु ही रे’ चित्रपटातील ‘गुलाबाची कळी’ असो, तिचा आवाज मराठीजनांच्या मनात घर करून आहे.
गायक, गीतकार, संगीतकार असा लौकिक असणारी वैशाली सामंत उद्योजिकाही आहे. उद्योजिकेच्या भूमिकेत शिरताना ‘पिझ्झा बॉक्स’ सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तोडीचा ब्रँड निर्माण करणारी वैशाली ‘इम्प्रेशन्स’ या इव्हेंट कंपनीचे संचालकपदही भूषवते आहे. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या वैशालीला ही प्रेरणा कुठून, कशी मिळाली ते तिच्याचकडून जाणून घेऊयात! हा कार्यक्रम विनामूल्य असून ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
कधी
१२ जुलै, सायं. ४.४५
कुठे
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,शिवाजी पार्क, दादर, मुंबई</p>