तारखा मिळत नसल्याने अन्य निर्माते नाराज

मुंबई : राज्यातील नाटय़गहे सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा निर्णय होण्यापूर्वीच मुंबईतील पालिकेच्या नाटय़गृहांनी डिसेंबपर्यंतच्या तारखांचे वाटप केल्याने आता नवा तंटा निर्माण झाला आहे. मोजक्याच निर्मात्याने तीन ते चार महिन्यांच्या तारखा आगाऊ निश्चित करून ठेवल्याने अन्य निर्मात्यांना नाटय़गृहे मिळणे कठीण झाले आहे. पालिकेच्या या निर्णयाला आक्षेप घेत निर्माता संघाने तारखांचे पुन्हा वाटप करण्याची मागणी केली आहे.

 मुख्यमंत्र्यांनी नाटय़गृहे सुरू करण्याची घोषणा करेपर्यंत नाटक कधी सुरू होणार याबाबात अनिश्चितता होती. मात्र शासन निर्णय येण्यापूर्वीच पालिकेने नाटय़गृहांच्या तारखांचे वाटप केले. निर्णय नसल्याने बहुतेक निर्मात्यांनी वाट पाहण्याचे धोरण अवलंबले. एक-दोन निर्मात्यांनी दोन महिन्यांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. त्यामुळे नाटय़गृहे सुरू होऊनही अनेक निर्मात्यांना मुंबईतील प्रयोगांसाठी जवळपास जानेवारीपर्यंत थांबावे लागणार आहे. जुलै महिन्यात पालिकेच्या बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह आणि विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृह प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यातील तारखांच्या नोंदणसाठीचे आवाहन केले होते. त्यावेळी परिस्थिती अनिश्चित असल्याने काही निर्मात्यांनी तारखा नोंदवण्याची जोखीम घेतली नाही. आता त्यांची तारखांवाचून परवड झाली आहे.

अभिनेते, निर्माते प्रशांत दामले यांच्या नाटकांचे प्रयोग सध्या बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात लागले आहेत. ‘करोनाकाळात तारखा वाटप करू नये असा कुठेही नियम नाही. नाटय़गृह प्रशासनाने प्रचलित पद्धतीनुसार निर्मात्यांना जुलै महिन्यात तारखांसाठीचे पत्र देण्यास सांगितले होते. त्यानुसार रीतसर पत्रव्यवहार करून तारखा मिळवल्या आहेत,’ असे प्रशांत दामले यांनी सांगितले. 

प्रशासनाचे स्पष्टीकरण

तारखा देण्याआधी निर्मात्यांना पूर्वसूचना दिली होती. परंतु तेव्हा कुणीही आक्षेप नोंदवला नाही. त्यावेळी नाटय़गृहाने केलेल्या आवाहनाला ३७ अर्ज आले, त्यानुसार तारखांचे वाटप झाले. किंबहुना ऐनवेळी घाई होऊन नये म्हणून रंगकर्मीच्या सोयीसाठीच आम्ही कोणत्याही आरक्षण शुल्काशिवाय तारखांची पूर्वनोंदणी घेतली, असे स्पष्टीकरण प्रबोधन नाटय़गृहाचे साहाय्यक व्यवस्थापक संदीप वैशंपायन यांनी दिले.

निर्मात्यांचा आक्षेप

एकीकडे तिसऱ्या लाटेची सांभाव्यता वारंवार वर्तवली जात होती. अशा कालावधीत नाटकाच्या तारखा वाटणे योग्य आहे का,’ असा प्रश्न निर्माता मंगेश कदम यांनी उपस्थित केला आहे. ‘नवी मुंबई पालिकेप्रमाणे अधिकृत घोषणेनंतर तारखा वाटप करायला हव्या होत्या. आमचा आक्षेप कोणत्याही निर्मात्यावर नसून पालिकेच्या नाटय़गृह प्रशासनावर आहे,’असे निर्माते राहुल भंडारे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर तारखाचे वाटप व्हायला हवे होते. ज्यांना तारखा मिळाल्या नाही त्यांनी तीन महिने नाटक करायचेच नाही का? त्यामुळे कोणावरही अन्याय न करता या तारखांचे पुन्हा वाटप व्हावे अशी आमची पालिका प्रशासनाला विनंती आहे.

संतोष काणेकर, अध्यक्ष, व्यावसायिक निर्माता संघ