scorecardresearch

मायक्रोसॉफ्टचे पुण्यात विदा केंद्र; दावोस परिषदेत महाराष्ट्र सरकारशी २३ कंपन्यांचे ३० हजार कोटींचे सामंजस्य करार

राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

मुंबई : दावोस आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांतील २३ कंपन्यांनी महाराष्ट्र सरकारशी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. त्यात आयटी क्षेत्रात आघाडीच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ३२०० कोटींच्या गुंतवणूक कराराचा समावेश आह़े  ही कंपनी पुण्यात विदा केंद्र उभारणार आह़े

दावोस येथील महाराष्ट्र दालनात झालेल्या सामंजस्य करारात एकूण ३०,३७९ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विविध करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, अन्न प्रक्रिया, स्टील, माहिती- तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक आदी क्षेत्रांचा समावेश आहे.

राज्याची अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण १२१ सामंजस्य करार झाले. त्यातून राज्यात एकूण २.१५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. याद्वारे सुमारे ४ लाख रोजगार निर्माण होणार आहेत.

या सामंजस्य करारांवेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर आदी उपस्थित होते.

वाहनउद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे पुणे हे केंद्र आहेच. पण फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांची उणीव होती, ती उणीवही आता भरून निघणार आहे. गुगलचे कार्यालय पुण्यात येऊ घातले आहे, त्या पाठोपाठ आता मायक्रोसॉफ्टही विदा केंद्राच्या माध्यमातून पुण्यात येत आहे. ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. या निमित्ताने रोजगार निर्मिती वाढण्यास मदत होईल.

प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर

विविध देशांतील २३ कंपन्यांनी राज्याशी ३०,३७९ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत़  या सर्व करारांद्वारे सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल़

सुभाष देसाई, उद्योगमंत्री

महत्वाचे करार असे..

इंडोरामा कॉर्पोरेशन

आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड यासारख्या प्रमुख वस्त्रोद्योग कंपन्या अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

’इंडोनेशियातील एक अग्रगण्य लगदा आणि कागद उत्पादक कंपनी आशिया पल्प अँड पेपर (एपीपी) ची संस्था सिनर्मास पल्प अँड पेपर प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये कागद आणि लगदा उत्पादनासाठी १०५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

’हॅवमोर आइस्क्रीम्स प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात आइस्क्रीम तयार करण्यासाठी युनिट सुरू करत असल्याने फूड अँड अ‍ॅग्रो प्रोसेसिंगलाही वाव मिळणार आहे. सोनई इटेबल आणि गोयल प्रोटिन्स तेल कंपन्यांचाही या करारांमध्ये समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Davos maharashtra signs 23 mous with investments worth rs 30000 crore zws

ताज्या बातम्या