बदलापुरातील गावदेवी परिसरात राहणाऱ्या सुजाता पात्रे (१५) या अल्पवयीन मुलीचा मृतदेह वांगणी आणि बदलापूरदरम्यान रेल्वे रुळांवर शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मिळाला आहे. सुजाता ही २ तारखेला सायंकाळी सात वाजता घरातून दूध आणायला जाते असे सांगून गेली होती. मात्र ती परत न आल्याने तिचे वडील दिनेश पात्रे यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुजाता ही दहावीत दोन वेळा नापास झाली होती. तसेच तिचे प्रेमसंबंध असल्याने तिचे अपहरण झाल्याचा संशयदेखील तिच्या वडिलांनी तक्रारीत व्यक्त केला होता. या प्रकरणी आता कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मुलीचा मृतदेह मुंबई येथे शवविच्छेदानासाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे नेमके कारण समजेल असे पोलिसांनी सांगितले.