शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील प्रकार
शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. मात्र, अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये संशयित रुग्ण आढळल्यावर काय करावे याची नियमावली स्पष्ट नसल्याने अजूनही रुग्णालयात गोंधळ निर्माण होत आहेत. क्षयरोग रुग्णालयात एक क्षयरुग्ण २० एप्रिलला दाखल झाला होता. करोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला केईएमला पाठविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला परत क्षयरुग्णालयात पाठविले. नाईलाजाने रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये त्याला २२ एप्रिलला दाखल केले आणि त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले. मात्र, तांत्रिक त्रुटींमुळे २३ एप्रिलला पुन्हा नव्याने नमुने पाठवावे लागले. त्याच दिवशी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या अहवालाची वाट न पाहता रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
अहवालात त्याला करोना झाल्याचे समोर आले. तोपर्यंत कर्मचाऱ्यांपासून नातेवाईकांपर्यत सर्वच जण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
