मुंबई : कांदिवली येथील चारकोप, सेक्टर १० परिसरात शनिवारी पर्यावरणप्रेमींनी स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान परिसरात अनेक मृत कासव आढळली. पर्यावरणप्रेमी कांदिवली परिसरात सातत्याने स्वच्छता मोहीम राबवित आहेत. मात्र करोनामुळे स्वच्छता मोहिमेत खंड पडला होता. या परिसरात ९ जूनपासून पुन्हा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.

कांदिवली येथील चारकोप सेक्टर १० परिसरात शनिवारी स्वच्छता मोहीम सुरू असताना अनेक मृत कासव, त्याचबरोबर मासे आढळले. जलचरांच्या मृत्युमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषण, तसेच पाण्यात विषारी घटक असल्याची शक्यता पर्यावरणप्रेमींनी वर्तविली आहे. दरम्यान, या स्वच्छता मोहिमेत पर्यावरणप्रेमींबरोबर एनएसएस, महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यांच्या मदतीने कांदळवन, तसेच अन्य परिसरात स्वच्छता करण्यात येते. या मोहिमेदरम्यान प्लास्टिकचा कचरा, काचेच्या बाटल्या आदी वस्तू मोठ्या प्रमाणात आढळल्या. परिणामी, त्याचा प्राण्यांना त्रास होत असल्याचे स्वच्छता मोहिमेत सहभागी मिली शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा…रेल्वे स्थानकात हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ प्रथमोपचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ऐरोली खाडी किनाऱ्यावर मृतावस्थेत हजारो मासे आढळले होते. वाढती उष्णता आणि रासायनिक प्रदुषणामुळे हा प्रकार घडला, असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. असा प्रकार दरवर्षी होत असून पर्यावरणप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.