सर्वसामान्य प्रेक्षकोंबरोबरच कर्णबधीर आणि अंधांनाही चित्रपट पाहण्याची मजा अनुभवता यावी यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅक्सेसिबिलीटी फॉर्मेट’ तंत्राचा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात वापर करण्यात येणार आहे. शनी शिंगणापूरच्या पाश्र्वभूमीवर घडणारी एक वेगळीच कथा आगामी ‘चौर्य’ या चित्रपटात पहायला मिळणार असून हा चित्रपट कर्णबधीर आणि अंधांनाही पाहता येईल, यादृष्टीने या तंत्राचा वापर के ला असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते निलेश नवलखा यांनी ‘लोकसत्ता मुंबई’शी बोलताना दिली.
‘अ‍ॅक्सेसिबिलीटी फॉर्मेट’ तंत्र जगभरात वापरले जाते. या तंत्रासाठी कोणत्याही एका प्रकारची ठराविक यंत्रणा नसते. तर चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये त्यासाठी काम करावे लागते, अशी माहिती नवलखा यांनी दिली. अंधांना चित्रपट दिसत नसल्याने त्यांना कथेतून प्रत्येक गोष्ट समजेल, अशापध्दतीने स्वतंत्रपणे वेगळ्या पध्दतीने कथा सांगितली जाते. ज्यात प्रत्येक आवाजही स्पष्टपणे ऐकू येतील, अशी व्यवस्था असते. बंदूकीतून गोळी सुटण्याचा प्रसंग असेल तर ती गोळी सुटली आहे इथपासून ते गोळीचा आवाज कसा आहे ते आणि ती समोरच्याला लागली आहे, इतक्या सविस्तरपणे पूर्ण प्रसंग ऐकवला जातो. तर कर्णबधीरांसाठी पडद्यावर वेगळी सबटायटल्स दिली जातात. या चित्रपटासाठी ठाण्यातील आशय सहस्त्रबुध्दे या अभियंत्याची मदत घेण्यात आली असल्याचे नवलखा यांनी सांगितले. ‘चौर्य’ सारखा चांगला मनोरंजक चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच यांनाही पाहता यावा, अशी आमची इच्छा होती. या तंत्रावर आशयने गेले तीन-चार वर्ष संशोधन केले आहे. हे तंत्र कसे वापरता येईल, यादृष्टीने आमची बरेच दिवस चर्चा सुरू होती. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रात १० लाख अंध आणि कर्णबधीर आहेत. यापेक्षा जास्त असू शकतील. त्यामुळे त्यांनाही चित्रपटांच्या मुख्य प्रावाहात आणण्याच्या दृष्टीने या तंत्राने चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
परदेशात इतर प्रेक्षकांबरोबरच कर्णबधीर आणि अंधांनाही एकाच चित्रपटगृहात चित्रपट बघणे शक्य असते कारण अंधांना स्वतंत्रपणे कथा ऐकण्यासाठी हेडफोन्स प्रत्येक आसनावर उपलब्ध असतात. तशी सोय आपल्याकडे नाही. त्यामुळे ‘चौर्य’ चित्रपटासाठी पुणे आणि मुंबईत एकेक चित्रपटगृह घेऊन तिथे स्वतंत्रपणे त्यांच्यासाठी चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. सुरूवातीला एखाद-दोन चित्रपटगृहातच दाखवणे शक्य होईल. त्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन हळूहळू त्याची संख्या वाढवता येईल, असा विश्वास नवलखा यांनी व्यक्त केला. सध्या या तंत्रासाठी निर्मितीच्या ४ते ५ टक्के खर्च जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या तंत्रासाठी खूप खर्च करावा लागत नसल्याने सगळ्यांनी मनावर घेतले तर इतरही चित्रपटांसाठीही या तंत्राचा वापर सहजशक्य असल्याची माहिती त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deaf and blind now feel the movie experience
First published on: 28-06-2016 at 02:48 IST