मुंबईः परदेशात पाठण्यात आलेल्या पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यामुळे अटकेची भीती घालून एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याची सुमारे साडेआठ लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी दोघांना अटक केली. तक्रारदारांना गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांना अटकेची भीती घालण्यात आली होती.

प्रवीण कोकणे आणि संतोष रेडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणातील तक्रारदार एका खासगी कंपनीत संचालक पदावर कामाला असून ते गोरेगाव येथील रहिवासी आहेत. ७ मार्चला त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्या व्यक्तीने आपण कुरियर कंपनीतून बोलत असून त्यांनी इराणला पाठवलेले पार्सल परत आले आहे. त्यात अमली पदार्थ सापडल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. ७५० ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) सापडले असून ते सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगण्यात आले. त्यांतर प्रदीप सावंत नावाने गुन्हे शाखेचा एक अधिकार तक्रारदारांशी बोलू लागला. त्यानंतर एका आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मोहम्मद इस्माईल मलिक याला अटक झाली असून त्याने तक्रारदाराच्या नावावर तीन बँक खाती उघडली होती.

हेही वाचा : भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

सध्या या गुन्ह्यांचा तपास डीसीपी मिलिंद भामरे यांच्याकडे आहे. त्यानंतर प्रदीपने त्यांचे बोलणे मिलिंद भामरेशी करुन दिले होते. त्या व्यक्तीने तुमच्या बँक खात्यतील रक्कम हस्तातरित करावी लागेल असे सांगितले होते. त्यानुसार तक्रारदारांनी त्यांच्या बँक खात्यातील आठ लाख ५७ हजार रुपये हस्तांतरित केले. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात पुन्हा जमा केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र बराच वेळ होऊन गेल्यानंतरही त्यांना ती रक्कम परत पाठविली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वनराई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित तोतया पोलीस अधिकार्‍याविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी प्रवीण कोकणे आणि संतोष रेडे या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्ययात आले होते. त्यांच्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.