मुंबई: राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आल्यानंतर मार्च २०२० नंतर प्रथमच मृतांच्या संख्येतही मोठी घट झाली असून मृत्यूदरातही घट झाली आहे. मृतांचे प्रमाण आणखी कमी होण्यासाठी मुंबई-पुण्यासह सातारा, नगर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे मृत्यू विश्लेषण अहवालातून समोर आले आहे. या अहवालात १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीतील मृत्यूंचे विश्लेषण करण्यात आले आहे.

गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर दिवाळी या लागोपाठ येणाऱ्या सणांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढेल अशी भिती व्यक्त करण्यात येत होती. परंतु दिवाळीनंतर आता पंधरा दिवस उलटून गेले तरी करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून मृतांच्या संख्येतही घट होत असल्याचे आढळले आहे.

राज्यात ऑगस्टमध्ये सुमारे १ लाख ५८ हजार रुग्णांचे नव्याने निदान केले जात होते. उत्तरोत्तर हे प्रमाण कमी झाले असून ऑक्टोबरमध्ये दरदिवशी साधारण ५९ हजार नवे रुग्ण सापडत आहेत.  राज्यात १६ नोव्हेंबपर्यंत सुमारे १५ हजार रुग्ण आढळले आहेत.

करोना संसर्गाचा प्रसार गेल्या महिन्यापासून वेगाने कमी होत असून मृतांच्या संख्येतही घट होत आहे. राज्यात ऑगस्टमध्ये २ हजार ९७७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. यावेळी मृत्यूदर १.८७ टक्के होता. ऑगस्टपासून मृतांच्या संख्येत घट झाली असून ऑक्टोबरमध्ये १०५४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. ऑक्टोबरमध्ये मृत्यूदर १.७७ टक्क्यांपर्यत घटला आहे. नोव्हेंबरमध्ये यात आणखी घट झाली असून १ ते १६ नोव्हेंबर या काळात केवळ २१४ मृत्यू झाले आहेत आणि मृत्यूदर १.४५ टक्के झाला आहे.

ऑक्टोबरमध्ये मुंबईत १७२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. १६ नोव्हेंबरपर्यत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दैनंदिन मृतांचे प्रमाणही आता खूप कमी झाले असून गेल्या आठवडाभरात केवळ १३ मृत्यू झाले आहेत.

नगर, साताऱ्यामध्येही घट

ऑक्टोबरमध्ये मुंबईपाठोपाठ नगर(१६१), सातारा(१३६), पुणे(१२४), सोलापूर(७८), ठाणे(७८) या जिल्ह्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. या जिल्ह्यांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून रुग्णसंख्याही कमी झाली आहे.

मृतांमध्ये अजूनही जीवनशैलीजन्य आजार असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून सर्वाधिक मृत्यू हे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे झाले आहेत.  त्याखालोखाल मधुमेह, मधुमेह आणि उच्च रक्तदाब एकत्रित, श्वसनाच्या आजार, फुप्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सतर्कता आवश्यक

परदेशात करोनाचे वाढते स्वरुप आणि गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता आपल्याकडे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे लसीकरणावर जसा भर देत आहोत. त्याप्रमाणे करोनाबाधितांची आणि मृतांची संख्या कमी झाली तरी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, असे डॉ. सुपे यांनी सांगितले.