मुंबई : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. देशाच्या राज्यघटनेने ही जबाबदारी राज्यांना दिली असून प्रत्येक राज्याला कधी ना कधी हा निर्णय घ्यावाच लागेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे केले. भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार आहे. कोणीही कोणत्याही राज्याचा मोठा औद्योगिक प्रकल्प पळवून नेऊ शकत नाही. गुजरातचे ज्याबाबतीत वैशिष्ठय़ आहे, ते प्रकल्प गुजरातला येतात, महाराष्ट्राची जी वैशिष्ठय़े आहेत, ते प्रकल्प महाराष्ट्रात येतात, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

गुजरात निवडणूक प्रचार दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी अहमदाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी समान नागरी कायद्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, देशाच्या राज्यघटनेने समान नागरी कायद्याबाबत राज्यांना जबाबदारी व निर्देश दिले आहेत.

पण काही कारणांमुळे देशात तो लागू होऊ शकलेला नाही. समान नागरी कायदा गोव्यात अंमलात आला असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये तो अंमलात आणण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याला याबाबत निर्णय घ्यावा लागणारच आहे. पण मी याची घोषणा करणार नाही, तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.

काही मोठे औद्योगिक प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्राची विकासाची गती मंदावली असल्याच्या आरोपांबाबत फडणवीस म्हणाले, कोणीही कोणाचेही प्रकल्प पळवून नेऊ शकत नाही. राज्याचे ज्या बाबीत वैशिष्ठय़ असेल, तसे प्रकल्प त्या राज्यात येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांमध्ये कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण ते भेदभाव करतात, हे दाखविण्यासाठी विरोधकांकडून याबाबत खोटे आरोप केले जातात. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावण संबोधल्याने त्याचा तीव्र निषेध करीत फडणवीस यांनी कडाडून टीका केली. पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणे, म्हणजे देशाबद्दल वापरणे होय. काँग्रेस नेते जाणूनबुजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करीत आहेत. मोदींनी देशाला एका वेगळय़ा उंचीवर नेऊन ठेवले आहे. मोदी यांनी अनेक वर्षे प्रलंबित असलेला रामजन्मभूमीचा प्रश्न सोडविला.

वीस लाख रोजगार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातची धुरा हाती घेतली, तेव्हापासून गेल्या २० वर्षांत गुजरातने कृषी, उद्योग व सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे आणि देशातील अत्यंत विकसित राज्यांमध्ये गुजरातचा समावेश झाला आहे. गुजरातची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट असून राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. मेट्रोचे जाळे तयार होत आहे. भाजपने गुजरातमध्ये २० लाख रोजगार निर्मितीचे आश्वासन दिले असून हा मोदींचा पक्ष जे बोलतो, त्याहून अधिक करुन दाखवितो. त्यामुळे पुढील पाच वर्षांत गुजरातचा आणखी वेगाने विकास होईल व सामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.