मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय लवकर व्हावा यासाठी विरोधकांकडून सातत्याने दबाब आणला जात असतानाच आपण लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने अध्यक्षांचा निर्णय काय असणार यावर चर्चा सुरू झाली. तर ९० दिवसांत अपात्रतेवर अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षांवर निकाल देताना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला एक महिन्याचा कालावधी होत असून अध्यक्षांनी लवकरच निर्णय घेतला नाही तर पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ‘दौलत’या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळय़ात बोलताना आपणही लवकरच क्रांतिकारक निर्णय घेणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. बाळासाहेब देसाई यांनी आपल्या कार्यातून कर्तृत्व घडविले. त्यांनी समाज, राज्य आणि देशाच्या विकासात योगदान दिले. त्यांनी सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे ईबीसी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा होय. त्यांनी ज्या ज्या खात्यात काम केले, त्या त्या खात्यात क्रांतिकारी निर्णय करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा उमटवला. ज्या प्रमाणे त्यांनी राजकीय आयुष्यात क्रांतिकारी निर्णय घेतले, त्यातून बरेचसे शिकून कदाचित मीही लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असे सूतोवाच नार्वेकर यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाजनांचा डोक्याला हात

विधानसभा अध्यक्षांच्या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित गिरीश महाजनांनी डोक्याला हात लावला. तेव्हा श्रोत्यांतून आलेल्या प्रतिक्रिया पाहून नार्वेकर यांनी ‘चिंता करायची गरज नाही. निर्णय काय असेल ते सांगितले नाही’, असे म्हणत बाजू सावरून घेतली. त्यावर महाजनांनी बसल्या बसल्याच ‘मेरिटवर निर्णय’ असे हसत म्हणताच नार्वेकरांनी त्याला दुजोरा देत योग्यतेवर निर्णय घेईन, असे स्पष्ट केले.