मुंबई: म्हाडाच्या सोडतीतील प्रतीक्षा यादीची प्रक्रिया कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णयावरून मंडळामंडळांमध्ये सुरू असलेला वाद अखेर म्हाडा प्राधिकरणाने मिटवला आहे. सोडतीत पुन्हा प्रतीक्षा यादीचा समावेश करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेशासाठी (एमएमआर) प्रतीक्षा यादीची मुदत एका वर्षांपर्यंत असणार असून उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मुदत सहा महिन्यांपर्यंत असणार आहे.

हेही वाचा >>> सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते

सोडतीनंतरच्या अर्थात घराच्या वितरणाच्या प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुळाशी प्रतीक्षा यादी हे मुख्य कारण असल्याचे म्हणत मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणासमोर ठेवला होता. या प्रस्तावानुसार प्राधिकरणाने आणि त्यानंतर राज्य सरकारने प्रतीक्षा यादी बंद करण्याचे जाहिर केले. या निर्णयानुसार औरंगाबाद मंडळाची सोडत प्रतिक्षा यादीविना निघाली. मात्र घरे विकली जात नसल्याने प्रतीक्षा यादी बंद करू नये अशी भूमिका घेत काही मंडळाने यादी बंद करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पुणे मंडळाने तर प्रतीक्षा यादी हवीच अशी ठाम भूमिका घेऊन प्रतीक्षा यादीसह सोडतही काढली.  मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा यादीवरून वाद रंगला होता.