शेतकऱ्यांना मदतीची काँग्रेसची मागणी

मुंबई : मराठवाड्यासह राज्यातील इतर भागांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी के ली आहे

मे महिन्यात  तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा हवाई पाहणी दौरा केला आणि बैठक घेऊन गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. शेजारच्या महाराष्ट्रातही तौक्ते चक्रीवादळाने मोठे नुकसान केले असताना देशाच्या पंतप्रधानांनी त्याची दखलही घेतली नाही. त्यानंतरही राज्याने केंद्राकडे मदत मागितली; परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली.

भाजप नेत्यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पटोले यांनी के ले.

पंचनामे पूर्ण होताच  मदतीचा निर्णय : वडेट्टीवार 

नागपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची जिल्हानिहाय माहिती घेणे सुरू आहे. हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर मदतीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

आत्महत्या वाढण्याची भीती

मराठवाड्यात  मोठे नुकसान झाले आहे. तेथे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती आहे. मराठवाड्यातील कापूस, सोयाबीनचे उद्ध्वस्त झाले आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.