अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘माहा’ या अतितीव्र चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन ते वायव्येकडे सरकले आहे. अद्यापही हे चक्रीवादळ तीव्र स्वरूपाचे असून, गुरुवार पहाटेपर्यंत चक्रीवादळ गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

‘कयार’ या चक्रीवादळानंतर ‘माहा’ हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले. मात्र, ‘माहा’ची तीव्रता ‘कयार’ या चक्रीवादळापेक्षा बरीच जास्त आहे. मान्सूनच्या परतीनंतर लागोपाठच्या चक्रीवादळांमुळे झालेल्या वातावरणातील बदलांनी राज्यात ऐन नोव्हेंबरमध्येही पावसाळी स्थिती आहे. ‘माहा’ चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत असल्याने महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसत आहे.

‘माहा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर आणि पोरबंदरपासून ६६० किलोमीटरवर आहे. गुरुवारी पहाटेपर्यंत पोरबंदर ते दीव दरम्यानच्या किनारपट्टीचा भाग ओलांडताना या चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टी भागात ७० ते  ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज

चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघर या जिल्ह्य़ांसह मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ होण्याची स्थिती

बंगालच्या उपसागरात अती तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल ते अंदमान दरम्यान बंगालपासून जवळपास ९९० किलोमीटर आणि अंदमानपासून एक हजार कि.मी.वर हे चक्रीवादळ निर्माण होण्याची स्थिती आहे. हे चक्रीवादळ बंगाल आणि ओडिशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.