बंडखोर आमदारांचा पंचतारांकित हॉटेलचा खर्च कोण करतंय? दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही भाजपाशी बोलतोय, पण…”

शिवसेनेचे बंडखोर आमदारांचा आलिशान पंचतारांकित हॉटेलमधील खर्च नेमकं कोण करतंय असा प्रश्न विचारला जात आहे.

Eknath-Shinde-Radisson-Blu-Guwahati-1
गुवाहाटीतील हॉटेलमध्ये जमलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचे बंडखोर आमदार आधी सुरतमध्ये आणि त्यानंतर गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहात आहेत. त्यामुळे एवढ्या आमदारांचा या आलिशान हॉटेलमधील खर्च नेमकं कोण करतंय असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच याबाबत भाजपाकडून सूत्रं हलवली जात असल्याही आरोप होतोय. याबाबत पत्रकारांनी बंडखोर आमदारांचे प्रतिनिधी दीपक केसरकर यांनाच हा प्रश्न विचारला. यावर केसरकर यांनी या खर्चाबाबत माहिती दिली. ते गुवाहटीमधून ऑनलाईन पद्दतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “आमदारांना चांगला पगार आहे. ते त्यांचा हॉटेलमधील खर्च उचलू शकतात. एकनाथ शिंदे आम्हाला इथं घेऊन आले आहेत. त्यांना त्याचे पैसे द्यावे लागणार आहेत. तो खर्च आम्ही करू. यामागे भाजपा नक्कीच नाही. आम्ही भाजपाशी बोलतोय, पण त्यामध्ये खर्चाचा काही भाग नाही.”

“आमदारांची परेड करणार का?”

“आवश्यकता असेल तर आम्ही परेड करू. आम्ही ते व्हिडीओ काढलेले आहेत. आता सगळं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सुरू आहे. करोनात कसं सगळं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर सुरू होतं, मग आतापण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर काम करावं. त्यात काय अडचण आहे?” असा सवाल करत केसरकर यांनी नाव न घेता ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

“उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवलं होतं, पण…”

दीपक केसरकर पुढे म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत राहू नये असं अनेक वेळा सुचवलं होतं. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे, असंही लक्षात आणून दिलं. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती. परंतु, तरी देखील त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही. एवढे लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.”

“आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत”

“घटनात्मक तरतुदीनुसार दोन त्रुतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेलं नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत,” असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

“लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन करणं चुकीचं”

दीपक केसरकर म्हणाले, “आम्ही कोणीही पक्ष सोडलेला नाही. लोकांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं जातं आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत आमचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नाही. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.”

हेही वाचा : “तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”

“शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीने हायजॅक केलं”

“शिवसेनेला बाकी कोणीही हायजॅक केलेलं नाही, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेच आम्हाला हायजॅक केलं होतं. त्यातून आम्ही बाहेर पडत आहोत. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे. ते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. अजूनही आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे,” असं केसरकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deepak kesarkar answer who is doing expense of five star hotels of rebel shivsena mla pbs

Next Story
“तुमच्यावर ईडीचा दबाव आहे का?”; पत्रकारांच्या प्रश्नावर बंडखोर आमदार म्हणाले, “२-३ आमदारांवर…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी