मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) मुंबई आणि महानगर परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे.करोना आणि टाळेबंदीमुळे मेट्रोची पहिली रेल्वेगाडी मुंबईत पोहचण्यास विलंब झाला आहे. पहिली रेल्वेगाडी जुलैअखेर मुंबईत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र त्यास आता वर्षअखेर होण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीएच्या वेळापत्रकानुसार डिसेंबर अखेर मेट्रो २ ए (डीएननगर ते दहिसर) आणि मेट्रो ७ (अंधेरी पू. ते दहिसर पू.) या दोन मार्गिका कार्यान्वित होणे अपेक्षित होते. तसेच या मार्गिकांसाठीची पहिली मेट्रो रेल्वेगाडी मुंबईत जुलैअखेर येण्याचे निश्चित होते. मात्र सध्या त्यास विलंब झाला आहे. या मार्गिकांवर धावणाऱ्या रेल्वेगाडीच्या डब्यांचे प्रारूप ३ सप्टेंबर २०१९ला मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ सप्टेंबर २०१९ला त्याचे उद्घाटन केले.

मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ बरोबरच मेट्रो २ बी (डीएननगर ते मंडाले) या तीन मार्गिकांसाठी एकूण ५०४ मेट्रो डब्यांच्या निर्मितीचे कंत्राट भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांना दिले आहे. सहा डब्यांची एक मेट्रो रेल्वेगाडी या प्रमाणे ८४ गाडय़ा निर्मितीचे काम सुरू आहे. सुमारे तीन हजार ८१६ कोटी रुपयांच्या या कंत्राटाचा करार १९ डिसेंबर २०१८ला करण्यात आला. काम पूर्ण करण्यासाठी २१० आठवडय़ांचा कालावधी ठरला आहे. करारानुसार डब्याचे आरेखन, निर्मिती, चाचणी, पुरवठा, जोडणीची सर्व जबाबदारी बीईएमएलवर आहे.  सहा कोचची पहिली प्रारूप मेट्रो रेल्वे जुलै २०२० पर्यंत उपलब्ध होणे अपेक्षित होते.