scorecardresearch

गोखले पुलाच्या पाडकामाला उशीर, ‘मेगा ब्लॉक’ घेण्याची शक्यता

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे पाडकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून सध्या या कामाला १५ दिवसांचा विलंब झाला आहे.

gokhale bridge

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे पाडकाम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून सध्या या कामाला १५ दिवसांचा विलंब झाला आहे. पावसाळय़ापूर्वी दोन मार्गिका सुरू करायच्या असतील तर कामाचा वेग वाढवावा लागणार असून त्याकरिता पुढील आठवडय़ात होळी आणि धूलिवंदनाच्या दिवशी मेगा ब्लॉक घेण्याचा विचार सुरू आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पुलाच्या पुनर्बाधणीचे काम प्रगतिपथावर आहे. पूल पाडण्याचे काम रेल्वेतर्फे सुरू आहे. तर नवीन पुलासाठी तुळई बनवून ती बसवण्याचे काम पालिकेतर्फे केले जाणार आहे. ही दोन्ही कामे समांतरपणे सुरू आहेत. या कामांचा दोन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांमार्फत वारंवार आढावा घेतला जात आहे. स्थानिक आमदार अमित साटम यांच्यासह पालिकेच्या आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाडकामाची पाहणी केली.

गोखले पुलाच्या दोन मार्गिका  पावसाळय़ापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. या पुलासाठी रेल्वे आणि पालिका या दोन संस्थांची कामे एकमेकांवर अवलंबून आहे. पश्चिम बाजू मोकळी करून २८ फेब्रुवारीपर्यंत  सुपूर्द करण्यात येणार होती. मात्र  हे पाडकाम झाले नसल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. त्यामुळे होळी व धूलिवंदनच्या दिवशी ८ तासांचा मेगा ब्लॉक घ्यावा अशी सूचना  अमित साटम यांनी केली.  

२८ मार्चपर्यंत काम पूर्ण?

पूर्व दिशेच्या पाडकामासाठी जागा मोकळी करून देण्याचे आश्वासन पालिकेने रेल्वेला दिले आहे. क्रेन उभ्या करण्यासाठी तीन झाडे हटवावी लागणार आहेत. २८ मार्चपर्यंत संपूर्ण जुनी तुळई हटवून रेल्वेच्या हद्दीतील पूर्ण भाग मोकळा करून पालिकेला सुपूर्द करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2023 at 01:32 IST