पहिल्याच दिवशी अनेक ज्येष्ठ नागरिक लशीविना माघारी

शैलजा तिवले

मुंबई : शहरात सोमवारपासून ६० वर्षांवरील नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) देण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक नागरिकांना मात्रा न घेताच केंद्रावरून परतावे लागले. कोविन यंत्रणेमधील त्रुटींमुळे लसीकरण प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने ही मात्रा घेण्यात अडचण येत आहे. विलेपार्ले येथे राहणारे ६८ वर्षीय महेंद्र बहेल आणि त्यांची ६३ वर्षीय पत्नी सोमवारी प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यासाठी गेले होते; परंतु त्यांना लस न घेताच माघारी जावे लागले आहे. महेंद्र यांनी ३१ मार्चला लशीची दुसरी मात्रा सेव्हन हिल्समध्ये घेतली होती; परंतु त्या वेळी कोविनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लसीकरणाची नोंद न झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यानंतर दोन ते तीन वेळा लसीकरण केंद्रावर खेटे घातले. मात्र तेव्हाही तांत्रिक कारणामुळे प्रमाणपत्र तयार झाले नसल्याचे सांगण्यात आले. अखेर जूनमध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, त्यावर दुसऱ्या मात्रेची तारीख ३ जून दाखवण्यात आली. प्रत्यक्ष दुसरी मात्रा घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी झाला तरी प्रमाणपत्रावरील तारखेनुसार नऊ महिने न झाल्यामुळे लस दिली नाही, असे बहेल यांनी सांगितले.

मार्च आणि एप्रिलदरम्यान कोविन अ‍ॅपमधील त्रुटींमुळे जवळपास पाच हजार नागरिकांचे प्रमाणपत्र उशिरा मिळाले आहे. हे नागरिक लसीकरण केंद्रावर येतात; परंतु कोविनमध्ये दुसऱ्या मात्रेनंतर नऊ महिने पूर्ण असलेल्यांचीच नोंदणी होत असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असे अंधेरीतील लसीकरण केंद्रावरील डॉक्टरांनी सांगितले. ओमायक्रॉनचा धोका कमी असला तरी ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे. मात्र, प्रतिबंधात्मक मात्राच मिळत नसल्याने हे नागरिक हतबल झाले आहेत.

एप्रिल, मेची तारीख

सरकारने सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मात्रा सुरू केली; परंतु यातील काही नागरिकांना प्रमाणपत्राच्या त्रुटींमुळे एप्रिल, मेमधील तारीख मिळाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वेगाने असताना ही मात्रा मिळत नसेल तर काय फायदा, असेही काही नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कोविनमधील त्रुटींमुळे प्रमाणपत्रे उशिरा मिळाली असली तरी त्यांची नोंद ज्या तारखेला झाली आहे त्यानुसारच तिसरी मात्रा घेता येईल. याबाबत काही करता येणार नाही.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका