आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार छोटा शकीलचे हस्तक असल्याचे सांगून पायधुनीतील एका व्यावसायिकाला ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे.
तक्रारदाराच्या दोन भागिदारांविरोधातही गुन्हा दाखल –
मोहम्मद अली रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या ४४ वर्षीय तक्रारदार दलालीचा (ब्रोकरेज) व्यवसाय करतात आहे. दोन भागिदारांकडून त्यांना येणाऱ्या रक्कमेच्या वादातून तक्रारदाराला धमकावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तक्रारदाराच्या दोन भागिदारांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठार मारण्याची धमकी दिली –
तक्रारदाराला दोन भागिदारांकडून काही रक्कम येणे बाकी होती. तक्रारदार या रकमेची वारंवार मागणी करीत होते. तक्रारदाराने पैसे मागू नये यासाठी त्यांच्या दोन भागिदारांनी कथित डी कंपनीच्या साथीदारांशी संपर्क साधला. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला धमकावण्यास सुरूवात केली. आरोपींनी तक्रारदाराला आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरूनही धमकी दिली. आरोपीो आपण छोटा शकीलचे हस्तक असून तक्रारदाराला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच ५० लाख रुपयांची खंडणीचीही मागितली.
प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग –
याप्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने मुंबई पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पडताळणी केली. तक्रारदाराच्या आरोपांमध्ये प्राथमिक पाहणीत तथ्य आढळल्यानंतर पायधुनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी खंडणी, मकावणे, कट रचणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराच्या दोन भागिदारांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.