चारकोप येथील ‘टर्जन पॉइंट’ तलावाचे संरक्षण न केल्यास अतिक्रमण होण्याची भीती
मुंबई : विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे प्राणी यांचा राबता असणाऱ्या आणि खारफु टींनी वेढलेल्या चारकोप सेक्टर ८ येथील ‘टर्जन पॉइंट’ तलावाचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित व्हावा आणि येथे कांदळवन पर्यटन सुरू करावे, अशी मागणी ‘मुंबई मार्च’ आणि काही स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. असे न झाल्यास हा निसर्गसंपन्न प्रदेश नष्ट होऊन या जागेवर खासगी मालकी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चारकोप सेक्टर ८ येथील ‘टर्जन पॉइंट’ येथे कांदळवनाने वेढलेला एक तलाव आहे. या परिसरात बुलबुल, मैना, सनबर्ड, रॉबिन, किंगफिशर इत्यादी १५० प्रकारचे पक्षी आढळतात. तसेच धामण, कोब्रा, पायथन यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचाही येथे वावर असतो. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या परिसरात पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या कमळांमुळे तलावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते. सध्या या परिसराला तारांचे कुंपण घालण्यात आल्याची माहिती ‘मुंबई मार्च’ संस्थेचे गोपाल झवेरी यांनी दिली. येथे एक सुरक्षारक्षक तैनात असून ही जागा आता खासगी मालकीची असल्याचे सांगण्यात येते, असे स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यां मिली शेट्टी यांनी सांगितले.
‘टर्जन पॉइंट’ हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला परिसर वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे या जागेला पक्षी अभयारण्य घोषित करून कायद्याने संरक्षण द्यावे, असे झवेरी यांचे म्हणणे आहे. येथे असणाऱ्या पक्ष्यांची माहिती त्यांच्या छायाचित्रांसह लावली जावी, छायाचित्रण करण्यासाठी छायाचित्रण उंचवटा (वॉच टॉवर) असावा, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय असावी, असे झवेरी यांनी सुचवले आहे. त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री, वन विभाग यांना पत्र लिहून येथे पक्षी अभयारण्य आणि कांदळवन पर्यटन सुरू करण्याची मागणी के ली आहे.
‘बिटर्न’ हा दुर्मीळ पक्षी २० वर्षांनी २०१९ साली ‘टर्जन पॉइंट’ येथे दिसला होता. अशा या परिसराचे संरक्षण व्हावे यासाठी मिली शेट्टी गेली १० वर्षे प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्थानिक आमदार, खासदार, म्हाडा, वन विभाग यांना पत्रे लिहिली आहेत; मात्र अद्याप याबाबत पावले उचलली जात नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.