मुंबई : मध्य रेल्वेवरील धोकादायक शीव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी पुन्हा नवीन तारीख देण्यात आली आहे. दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव या पुलाचे काम पुन्हा एक महिना पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र, या जीर्ण पुलाचा धोका कायम असल्याने वाहतूक तज्ज्ञांनी पुलाचे पाडकाम लवकरात लवकर सुरू करावे असे मत व्यक्त केले आहे.
ब्रिटिशकालीन शीव उड्डाणपुलाचे पाडकाम करण्याचा विचार अनेक कालावधीपासून सुरू आहे. २० जानेवारी २०२४ रोजी पाडकाम करण्याचे ठरवण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी काम पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानंतर हे काम २९ फेब्रुवारी रोजीपासून करण्याचे ठरवण्यात आले. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने ऐन परीक्षेच्या हंगामात पूल बंद केला तर विद्यार्थ्यांसह सर्वांची गैरसोय होईल. शीव, माटुंगा, कुर्ला व लगतच्या परिसरात अनेक शाळा असून, परिक्षा केंद्र आहेत. परिणामी परीक्षा काळात हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. दरम्यान, २९ फेब्रुवारीपासून पूल बंद केला जाणार होता आणि त्यानंतर पूलाचे पाडकाम हाती घेतले जाणार होते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचे काम पुढे ढकलले आहे. साधारणपणे २३ मार्चनंतर हे काम सुरू केले जाईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.