कल्याण-डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील एक डॉक्टर व दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञांना डेंग्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील काही दिवसांपासून हे तिन्ही कर्मचारी डेंग्यूच्या आजारावर उपचार घेत आहेत.
डेंग्यूची बाधा झालेला पालिकेचा डॉक्टर कल्याणमधील खडकपाडा भागातील मोहन पार्क परिसरात राहतो. या डॉक्टरला डेंग्यूची बाधा झाल्यानंतर या डॉक्टरला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘तुम्ही याबाबत कोठेही वाच्यता करू नका. गप्प राहून घरी उपचार घ्या. कोठे काही बोललात तर लक्षात ठेवा,’ असा दम भरला असल्याचे बोलले जाते. नोकरीवर गदा नको आणि सेवा पुस्तिकेत खराब शेरा नको म्हणून डेंग्यूची बाधा झालेल्या या डॉक्टरने मुकाटय़ाने उपचार घेतले असल्याचे समजते. डेंग्यूचा रुग्ण आढळल्यानंतर परिसरातील पाणी, नागरिकांची तपासणी करण्यात आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. असा प्रकार केला, तर नागरिक, प्रसिद्धी माध्यमांना संशय येईल, असा विचार करण्यात आला आहे. रक्त तपासणी करणाऱ्या दोन तंत्रज्ञांनाही डेंग्यूची बाधा झाली आहे. तेही उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे स्थायी समितीत देण्यात आली होती.
‘तसे काही नाही’
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले, की रुग्णालयातील कोणालाही डेंग्यूची बाधा झाली आहे याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाही. या वेळी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लीलाधर म्हसके यांचा मोबाइल बंद होता. तर  मुख्य अधिकारी डॉ. अशोक भिडे रजेवर आहेत.