मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्यांना अतिताणामुळे उद्भवणारे मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रासले असतानाच, आता डेंग्यूनेही गाठले आहे. नायगावातील पोलीस वसाहतीला या आजाराचा मोठा फटका बसला असून येथील इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने सध्या डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून परिसरात अस्वच्छता, साचलेले पाणी, उंदीर घुशींचा उच्छाद यामुळे नायगावातील पोलीस वसाहतीत मोठय़ा प्रमाणात आजारांनी थैमान घातले आहे. येथे पोलीसांच्या एकूण १ ते ९ इमारती आहेत. या प्रत्येक इमारतीच्या मजल्यावर एकूण २१ खोल्या आहेत.

या प्रत्येक मजल्यावर डेंग्यू किंवा इतर आजारांचे तीन ते चार रुग्ण आढळून येत आहेत. केवळ डेंग्यूच नव्हे तर इमारतीच्या शौचालयात, आवारात साचलेले पाणी, त्यांवर होणारी डांसाची पैदास यामुळे ताप, हिवताप सारख्या इतर आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे येथे राहत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितले.

परळ भागात गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे एकूण २५ संशयित रुग्ण, तर सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे २९ रुग्ण आढळले आहेत. मात्र पालिकेच्या वतीने आम्ही संपूर्ण नायगाव आणि परळ सारख्या भागात डेंग्यू व इतर आजारांबाबत लोकांमध्ये जाणीवजागृती करीत आहोत. मात्र, पावसाचे पाणी साचल्यामुळे डेंग्यूची पैदास वाढत असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर येणारा पाऊस, परिसरातील अस्वच्छता, घरातील डास आणि इमारतीतील शौचालयांची दुरवस्था यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये पोलीस वसाहतीत मोठय़ा प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाच्या पाण्यामुळे इमारतीच्या खाली मोठा खड्डा पडून त्यात साचलेल्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात अळ्या तयार झाल्या होत्या. कित्येक दिवस तिथे अशीच अवस्था होती. मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. तसेच अनेकजण वेळेवर उपचारासाठी जात नसल्याने आणि सामाजिक जनजागृती नसल्याने प्रत्येक इमारतीत रुग्ण आढळून येत आहेत.

अमोल मोरे, रहिवासी, नायगाव पोलीस वसाहत.