मुंबई : भारतात दातांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले असून लहान मुलांचे दंत आरोग्य ही एक गंभीर समस्या बनताना दिसत आहे. भारतात दात तसेच तोंडाच्या आरोग्याकडे फारसा गांभीर्याने पाहिल जात नाही. प्रत्यक्षात देशात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक नागरिक विविध प्रकारच्या दातांच्या किंवा तोंडाच्या समस्यांनी ग्रस्त असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या २०२४ च्या अहवालातून समोर आल आहे. यातील चिंतेची गोष्ट म्हणजे या समस्यांमध्ये सर्वाधिक प्राबल्य आहे ते म्हणजे लहान वयात दात किडणे, पौगंडावस्थेत हिरड्यांचे आजार, प्रौढांमध्ये तोंडाचा कर्करोग आणि वृद्धांमध्ये दात गळणे. मात्र शासकीय पातळीवर आजाही मौखिक आरोग्याला म्हणावे तसे महत्व दिले जाताना दिसत नाही.

आयसीएमआर व डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया (डिसीआय) यांच्या अहवालानुसार ५ ते १५ वयोगटातील बालकांपैकी सुमारे ६२ टक्क्यांमध्ये किडलेले दात आढळतात. ग्रामीण भागांमध्ये हा आकडा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. प्रौढांमध्ये हिरड्यांची सूज, दात हलणे आणि मुखदुर्गंधी यांसारख्या समस्या अतिशय सामान्य बनल्या आहेत. एकूणच देशातील प्रत्येक चार व्यक्तींमागे एकाला दंत संबंधित त्रास आहे, परंतु त्यापैकी फारच थोड्या रुग्णांकडून उपचार घेतले जातात.

तोंडाच्या आजारांमध्ये सर्वात गंभीर प्रकार म्हणजे मुख कर्करोग. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (एनसीपीआर) च्या २०२३ च्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी जवळपास १.२ लाख नवीन मुख कर्करोग रुग्णांची नोंद होते. त्यातल्या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये तंबाखू, गुटखा, खैनी, पानमसाल्याच्या सेवनामुळे हा आजार निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील मुख कर्करोग मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे भारतात होतात.

या पार्श्वभूमीवर दंतचिकित्सा सेवांची उपलब्धता ही आणखी एक गंभीर बाब ठरते. देशात सुमारे ३ लाख दंतचिकित्सक असले तरी त्यातील ८५ टक्के शहरी भागात कार्यरत आहेत. ग्रामीण भारतात प्रत्येकी १ लाख लोकसंख्येमागे केवळ एक दंत डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाने दिली आहे. यामुळे लाखो लोकांना त्यांच्या लहानसहान दंत समस्या दुर्लक्षित ठेवाव्या लागतात ज्या पुढे जाऊन ते गंभीर स्वरूप धारण करतात.

शाळांमध्येही दंत आरोग्य शिक्षणावर फारसा भर दिला जात नाही. यिनिसेफ व इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या २०२२ च्या अहवालानुसार भारतात केवळ १२ टक्के शाळांमध्ये नियमित दंत तपासणी केली जाते. दातांची निगा राखण्याच्या सवयी बालवयातच घालून देण अत्यंत आवश्यक असतानाही या विषयाकडे शैक्षणिक धोरणात दुर्लक्ष झाल आहे.दंत आरोग्यावर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ मध्ये फारच मर्यादित उल्लेख आहे. जरी राष्ट्रीय तोंड आरोग्य कार्यक्रम २०१४ मध्ये सुरू झाला असला, तरी तो काही निवडक राज्यांपुरताच मर्यादित राहिला आहे. ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये दंत तपासणीसाठी आवश्यक साधन, कर्मचारी आणि जागेची कमतरता आजही मोठ्या प्रमाणावर आहे. मौखिक आरोग्यावर जनजागृती करणाऱ्या मोहिमा या फारशा प्रभावी ठरताना दिसत नाहीत. बहुतांश नागरिकांमध्ये अजूनही “वय वाढल्यावर दात पडतातच”, “गुटखा फक्त सवय आहे, त्रास नाही” अशा चुकीच्या समजुती प्रचलित आहेत.

दंत आरोग्याची शासनाकडून उपेक्षा

आता वेळ आली आहे की दंत आरोग्याला आरोग्यसेवेत मुलभूत घटक म्हणून मान्यता द्यावी लागेल. केंद्र व राज्य सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दंत सेवांचा समावेश करणे, प्रत्येक शाळेत दरवर्षी दंत तपासणी अनिवार्य करणे तसेच तंबाखूजन्य पदार्थांवर कडक नियंत्रण आणणे या पातळ्यांवर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे,मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ मानसिंग पवार यांनी सांगितले. वेगाने वाढणाऱ्या दंत आरोग्य समस्येला शहरी भागात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात अजूनही फायबरयुक्त खाणे असल्यामुळे तेथे दातापेक्षा हिरड्यांचे प्रश्न दिसून येतात. अर्थात त्याची कारणे वेगळी आहेत. लहान मुलांच्या दंत आरोग्याबाबत पालकच उदासीन असल्याचे दिसून येते. आई-वडील दोघेही नोकरी करत असल्याने मुलांचे चॉकलेट तसेच जंक फूड देऊन चुकीच्या पद्धतीने लाड केले जातात तसेच खाल्यानंतर लगेच चूळ भरावी याकडेही लक्ष दिले जात नाही, यातून समस्या वाढते असे डॉ पवार म्हणाले. खरतर सरकार काय करत यापेक्षा तुम्हीच तुमचे मौखिक आरोग्य सांभाळणे आवश्यक असल्याचे डॉ मानसिंग पवार म्हणाले.

लहान मुलांचे दात जपा

दात फक्त हसण्यासाठी नसून ते पचन, बोलण आणि एकूण आरोग्याच दर्पण आहे. दातांची उपेक्षा म्हणजे स्वत:च्या आरोग्याची उपेक्षा हे समजून घेऊन मौखिक आरोग्याकडे पाहाणे गरजेचे असल्याचे नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ कुलविंदरसिंग बांगा यांनी सांगितले. सरकार जेवढे लक्ष जनरल हेल्थ व कॅन्सरवर देते तेवढे लक्ष ओरल हेल्थवर देत नाही हे वास्तव आहे. मौखिक आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचे असून सध्या ‘कबुतरबाजी’वर सरकार व वेगवेगळ्या पक्षांचे नेते जेवढे बोलताना दिसत आहे त्याच्या दहा टक्के जरी या लोकांनी मौखिक व दंत आरोग्याकडे लक्ष दिले तरी मौखिक व दंत आरोग्याचे अनेक प्रश्न सुटतील, असे डॉ बांगा मिश्किलपणे म्हणाले.शहरी भागात लहान मुलांच्या दातांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून गोड व जंयफूड ऐवजी पालकांनी त्यांना फायबरयुक्त खाणे देणे तसेच तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगणे गरजेचे असल्याचे डॉ बांगा म्हणाले.