मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे, स्वीय साहाय्यक कुंदन शिंदे आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी करण्यास दोन विशेष न्यायालयांनी शुक्रवारी सीबीआयला परवानगी दिली. त्यामुळे याप्रकरणी देशमुख, वाझे यांच्यासह अन्य आरोपींची सीबीआयकडून पुन्हा चौकशी केली जाणार आहे.
न्यायालयाच्या परवानगीनंतर फेब्रुवारी महिन्यात या सगळय़ांची कारागृहात जाऊन सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यावेळी एकाही आरोपीने चौकशीत सहकार्य केले नव्हते, असा दावा करून त्यांची कोठडी देण्याच्या मागणीसाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. परंतु वाझे हे राष्ट्रीय तपास यंत्रणा कायद्याअंतर्गत (एनआयए) स्थापन विशेष न्यायालयाने सुनावलेल्या, तर देशमुख व अन्य आरोपी हे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे विशेष सीबीआय न्यायालयाने या दोन्ही न्यायालयांना पत्रव्यवहार केला होता. तसेच सगळय़ा आरोपींच्या चौकशीसाठी सीबीआयला कोठडी मंजूर करण्याची परवानगी देण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर पीएमएलए व एनआयए न्यायालयाने देशमुख, वाझे व अन्य आरोपींच्या चौकशीची सीबीआयची मागणी मान्य केली.