मुंबई : वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेरील वाहतूक कोडींच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १५ महिन्यांत नव्याने आकाशमार्गिका (स्कायवॉक) बांधण्यात येईल या तुम्हीच दिलेल्या हमीचे काय झाले ? आश्वासन देऊनही या स्कावॉकचे बांधकाम अद्याप अपूर्ण का ? अशी प्रश्नांची सरबत्ती उच्च न्यायालयाने बुधवारी महापालिका प्रशासनावर केली. तसेच, स्वतःचा शब्द न पाळणाऱ्या महापालिका प्रशासनावर अवमान कारवाई का करू नये ? अशी विचारणा करून विलंबाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी न्यायालयाने महापालिकेला शेवटची संधी दिली.
वांद्रे स्थानक (पूर्व) ते कलानगर या स्कायवॉकचे बांधकाम १५ महिन्यांत पूर्ण करावे, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर, स्कायवॉकचे काम सुरू करण्यात आले असून काम हाती घेण्यात आल्यापासून १५ महिन्यांत ते पूर्ण करण्यात येईल, अशी हमी महापालिकेने ऑगस्ट २०२४ मध्ये न्यायालयाला दिली होती. त्याची दखल घेऊन न्यायालयाने यासंदर्भातील याचिका निकाली काढली होती. परंतु, आश्वासनाचा कालावधी उलटूनही स्कायवॉकचे अपूर्णच आहे, असा दावा करून वकील के. पी. पी. नायर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे व अवमान याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे नायर याच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयात दिलेल्या हमीची महापालिका प्रशासनाने पूर्तता केलेली नाही. जवळपास १९ महिने उलटले तरीही स्कायवॉकचे फक्त खांब बांधण्यात आले आहेत, असे नायर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांनी काही छायाचित्रेही न्यायालयात सादर केली. त्याची दखल घेऊन या स्कायवॉकच्या कंत्राटदाराबाबत न्यायालयाने महापालिकेच्या वकिलांकडे विचारणा केली. परंतु, त्यावर काहीच उत्तर दिले न गेल्याने न्ययालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच, महापालिका प्रशासन स्वतः दिलेल्या हमीची पूर्तता करत नाही, असे सुनावताना तुमच्याविरोधात अवमान कारवाई का करु नये ? अशी विचारणा न्यायालयाने महापालिकेकडे केली. त्याचप्रमाणे स्कायवॉकच्या बांधकामाला झालेल्या विलंबाबाबत भूमिका मांडण्यासाठी शेवटची संधी देऊन न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.
प्रकरण काय ?
वांद्रे स्थानक (पूर्व) ते कलानगर तथा म्हाडा कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पुन्हा स्कायवॉक बांधण्याची मागणी नायर यांनी उच्च न्यायालयात केली होती. या दिशेने दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर एकच पदपथ असून सततची वर्दळ आणि रिक्षा, अन्य वाहनांची गर्दी यामुळे या मार्गावर अनेक अपघात होतात, असा दावा त्यांनी याचिकेत केला होता. दुसरीकडे, मुंबईतील पहिला स्कायवॉक अशी ओळख असलेला हा स्कायवॉक एमएमआरडीएने २००८-२००९ मध्ये गर्दी टाळण्यासाठी बांधला होता. त्यानंतर, तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. परंतु, स्कायवॉक असुरिक्षत असल्याचे निदर्शनास येताच २०१९ मध्ये तो पाडण्यात आला.