मुंबई : यंदा मुंबईत मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. मुंबईकर शुक्रवारीही घामाच्या धारांनी हैराण झाले होते. दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येत नाही. याचबरोबर तापमानातही चढ – उतार सुरू आहे.
मुंबईकर सध्या उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. वाढता उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मध्येच ढगाळ वातावरण, तर मध्येच उन्हाचा ताप. यामुळे मुंबईत उकाडा वाढला आहे. कडकडीत ऊन, असह्य उकाडा आणि घामाच्या धारांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून उकाडा जाणवत होता. घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आर्द्रतेचे प्रमाणही अधिक होते. मागील तीन दिवसांपूर्वी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा उन्हाचा तडाखा सोसावा लागत आहे. पावसाळा म्हणजे थंड हवामान अशी अपेक्षा असते, पण प्रत्यक्षात हवामानात दमटपणा आणि स्थिर उष्णता यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे.
दरम्यान, समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे घामाचा त्रास मुंबईकरांना अधिक होतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. त्यामुळे गळून गेल्यासारखे वाटणे, थकवा येणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि घामाच्या धारांनी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडत असून ताप, सर्दीचा त्रास होऊ लागला आहे.