मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कोणतेही धार्मिक कार्य करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केलेली असताना श्रावणी सोमवारी सुमारे चारशे त पाचशे जणांनी कावड यात्रेसाठी उद्यानात घुसून नदीतून पाणी भरून घेतले. सोमवारी राष्ट्रीय उद्यान बंद असताना व परवानगी नसतानाही एवढ्या मोठ्या संख्येने एक जमाव कावड यात्रेचे पाणी घेण्यासाठी उद्यानात शिरल्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. बोरिवलीतील आमदार संजय उपाध्याय यांच्या उपस्थितीत हा जमाव कावडयात्रेसाठी उद्यानात शिरल्यामुळे या विषयाला राजकीय वळण आले आहे. नेतेमंडळींच्या आशीर्वादाने संजय गाधी उद्यानाचे इव्हेण्ट पार्क झाल्याचीही टीका होऊ लागली आहे.

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नदीतून कावड यात्रेसाठी पाणी घेण्यावरून यंदाही वाद निर्माण झाला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नदीत होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे नदी प्रदूषित होत असल्याबाबत २०२२ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने उद्यानात कोणतेही धार्मिक विधी करण्यास मनाई केली होती. त्यामुळे तेथे होणाऱ्या सर्वच धार्मिक कार्यक्रमांना व्यवस्थापन परवानगी नाकारते. परंतु, सोमवारी कावड यात्रेसाठी पाणी घेण्याची परवानगी द्यावी यासाठी उत्तर भारतीय समाजातील लोकांनी रविवारी रात्री उशीरापर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ठाण मांडला होते. त्यांना व्यवस्थापनाने कृत्रिम तलावाचीही सोय करून दिली होती. मात्र कृत्रिम तलाव नाकारून जमावाने उद्यानात सोमवारी प्रवेश केला व नदीतून कावड यात्रेसाठी पाणी घेतले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात आणि आमदार संजय उपाध्याय आणि चारशे ते पाचशे जणांच्या उपस्थितीत हा धार्मिक कार्यक्रम झाला. त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे. मुक्त पत्रकार नेत्वा धुरी यांनी हे प्रकरण उघडकीस आणले.

उपाध्याय कायद्यापेक्षा मोठे ?

उद्यानात काही वर्षांपूर्वी छट पूजा होत होती आता कावड यात्राही होते. उद्यानाचा इव्हेंट पार्क केला असल्याची टीका पर्यावरणवादी डी स्टॅलिन यांनी केली आहे. कावड यात्रेसाठी वाहत्या नदीतून पाणी घ्यायचे असते तर मग मुंबईतील नद्यांची गटारे झाली तेव्हा हे कुठे होते अशी टीका स्टॅलिन यांनी केली आहे. कायदयाचे रक्षण करणारेच या जमावाला संरक्षण देतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. केवळ महाशिवरात्र या एकाच दिवशी न्यायालयाने सूट दिली आहे. मग उपाध्याय हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का असाही सवाल स्टॅलिन यांनी केला आहे.

संजय उपाध्याय यांचे काय म्हणणे?

दरम्यान, याबाबत आमदार संजय उपाध्याय यांना संपर्क साधला असता ते म्हणाले, या कावड यात्रेसाठी मी अर्ज केला नव्हता. तेथे जमलेले नागरिक ऐकत नव्हते म्हणून मला बोलवून घेण्यात आले होते. संजय गांधी उद्यानात गेली वीस वर्षे कावड यात्रेसाठी भक्त जातात. मग तेथून पाणी घेतले तर त्यात चूक काय असा सवाल उपाध्याय यांनी केला आहे आम्हाला वनअधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच आम्ही गेलो असाही दावा त्यांनी केला आहे. या ठिकाणी आम्ही कोणतीही घोषणा दिल्या नाहीत, एक पानही तोडले नाही की गांडूळही मारला नाही, असे सांगत हिंदू हितासाठी मी आक्रमक होणारच असाही इशाराही त्यांनी दिला आहे. न्यायालयाने दिलेले आदेश हे केवळ गणपती विसर्जनापुरते आहेत त्यात कावड यात्रेचा उल्लेखही नाही. आता तर न्यायालयाने नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन करण्यासही परवानगी दिली आहे, असाही युक्तीवाद उपाध्याय यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ

याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता जमावाला परवानगी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी उद्यान बंद असले तरी पाड्यावरील नागरिकांना ये जा करण्यासाठी काही मार्ग खुले असतात. त्यामुळे हे नागरिक नक्की कुठून आले, किती आले याबाबत अहवाल मागवला आहे. तसेच या प्रकरणी कोणती कारवाई करता येईल याबाबतही आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ असेही ते म्हणाले.