मुंबई : शाळांमधील शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने २०१९ मध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यास परवानगी दिली. त्यानुसार ९० दिवसांच्या मुदतीवर शाळांमधील पटसंख्येच्या अनुषंगाने शिक्षकांची भरती करण्यात येत होती. त्यामुळे अनेक शाळांना शिक्षक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र यंदा शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्यापपर्यंत या कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यासंदर्भात पालिका प्रशासनाकडून शाळा मुख्याध्यापकांना कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परिणामी शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या तासिका घेताना कार्यरत शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध नसल्याने अनेक ऑनलाईन व शैक्षणिक कामेही वेळेत होत नाहीत. परिणामी, समाधानकारक काम न करणाऱ्या शिक्षकांवर तातडीने कारवाही करण्यात येणाऱ्या अडचणी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने डिसेंबर २०१९ मध्ये परिपत्रक काढून कंत्राटी पद्धतीने ९० दिवसांच्या मुदतीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला.
या शिक्षकांना तासाला १५० रुपये याप्रमाणे मासिक सुमारे १७ हजार रुपये मानधन देऊन त्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नियुक्तीचे सर्व अधिकार शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सोपविण्यात आले. मात्र शाळेतील एकूण मंजूर शिक्षकांच्या ४० टक्के जागा रिक्त ठेवून ही शिक्षक भरती करण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. दरवर्षी शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर १ जुलैपासून ही भरती मुख्याध्यापकांना करता येते. मात्र यंदा शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून कंत्राटी शिक्षक भरती करण्यासंदर्भात कोणतीही मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अपुऱ्या शिक्षकांच्या मदतीने मुख्याध्यापकांना वर्ग चालवावे लागत आहेत. अनेक शाळांमध्ये पहिली ते चौथी दरम्यान जवळ ३२५ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांसाठी फक्त चारच शिक्षक आहेत. त्यामुळे हे वर्ग चालवताना शिक्षकांची तारांबळ उडत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. तसेच अनेक शाळांचा दहावीचा निकालही १०० टक्के लागत आहे. महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी शिक्षणामध्ये उत्तम कामगिरी करीत आहेत. मात्र शिक्षक उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून करविण्यात येत आहे.
भरतीची प्रक्रिया परिपत्रकातील निर्देशाप्रमाणेच महानगरपालिका प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकामधील निर्देशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकारी व शाळा मुख्याध्यापकांकडून ही शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच शासनाच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेले शिक्षकही पुढील काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांच्या कमतरतेचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम
दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण देण्यात यावे, या सरकारच्या निर्णयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये ऑटिझमचे विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच ऑटिझमच्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देताना शिक्षकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर कंत्राटी शिक्षकांची भरती करावी, अशी मागणी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षकांकडून करण्यात येत आहे.