scorecardresearch

देणग्या उभारून वरळी स्मशानभूमीचा विकास

वरळीतील सर्वात जुन्या स्मशानभूमीच्या जागेवर जागतिक दर्जाची सर्व धर्मीय आणि करोना प्रतिबंधक अशी स्मशानभूमी साकारली जाते आहे.

जागतिक दर्जाच्या स्मशानभूमीसाठी कंपन्यांकडून आर्थिक मदत

मुंबई : वरळीतील सर्वात जुन्या स्मशानभूमीच्या जागेवर जागतिक दर्जाची सर्व धर्मीय आणि करोना प्रतिबंधक अशी स्मशानभूमी साकारली जाते आहे. एका खाजगी ट्रस्टने पालिकेच्या या स्मशानभूमीच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. तब्बल ८० हजार चौरस फुटाचे  बांधकाम असलेल्या या अद्ययावत स्मशानभूमीसाठी संस्थेने कंपन्यांकडून देणग्या उभारून हे काम पूर्णत्वास नेले आहे. तब्बल ४० कोटींचा खर्च आणि पाच वर्षांची देखभाल व प्रचालन हे देणग्यांच्या रकमेतून केले जाणार आहे.  निकटवर्तीयांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांसाठी नातेवाईकांना स्मशानात जाण्याची वेळ येते पण तिथला अनुभव खूप क्लेषदायक आणि दु:खद असतो. मुंबईत दोनशेच्या आसपास स्मशानभूमी असल्या तरी त्यांची दूरवस्था झालेली आहे.  हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेत हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टने वरळीच्या माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचा कायापालट सुरू केला आहे.  ट्रस्टच्या अंतिम संस्कार सेवा या उपक्रमांतर्गत हे काम केले जात आहे. पालिकेच्या जी दक्षिण विभागाने त्याकरिता संस्थेशी करार केला आहे.

 जुन्या स्मशानभूमीचा विकास करण्याचे काम सध्या सुरू असून लवकरच या स्मशानभूमीच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होणार आहेत.  नऊ एकर जमिनीवर ही स्मशानभूमी विकसित करण्यात येत आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूने दोन एकर जागेवर उद्याने, हिरवळ साकारण्यात येणार असल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र गोल्हार यांनी दिली. अंत्यसंस्कारासाठी सोबत येणाऱ्या नागरिकांना, महिलांना थांबता यावे याकरिता प्रतीक्षागृहे, प्रसाधनगृहे यांचीही सोय देण्यात येणार आहे.  सध्या चार मंडप तयार होत असून जुन्या चार चितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. चार अद्ययावत मंडपांचे लोकार्पण मार्च अखेरीपर्यंत होणार असून त्यानंतर उर्वरित चार मंडपांचा विकास केला जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामध्ये पारंपरिक दहन अंत्यसंस्कारांबरोबरच, विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी असेही पर्याय असणार आहेत.   बडय़ा कंपन्यांची मदत हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टने या कामासाठी आराखडा तयार केला असून हे काम करण्यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता वैयक्तिक आणि कंपन्यांकडून देणग्या उभारून काम केले जात आहे. आतापर्यंत जिंदाल स्टील वर्क्‍स, मिहद्रा ग्रुप, टाटा ग्रुप, एचडीएफसी, कोटक मिहद्रा बॅंक, पिडीलाइट इंडस्ट्री अशा विविध कंपन्यांनी सढळ हस्ते मदत केली असल्याची माहिती ट्रस्टचे डॉ. भरत पारेख यांनी दिली. तर किशोर मारीवाला, रामदेव अगरवाल, हरी मुंद्रा, के व्ही कामत यांनीही व्यक्तिगत पातळीवर आर्थिक मदत दिली असून त्याच्या पावत्याही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वधर्मीय स्मशानभूमी

 या स्मशानभूमीत एकावेळी आठ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतील अशी सोय आहे. मात्र प्रत्येक चितेकरिता स्वतंत्र असे आठ अर्धगोलाकार वास्तू किंवा मंडप उभारण्यात येणार आहेत. यामध्ये नागरिकांना आपापल्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कारांचे विधीही करता येणार आहेत. पारशी समाजही आजकाल दहन विधी करण्याचा पर्याय स्वीकारतात, त्यामुळे त्यांच्यासाठीही या ठिकाणी प्रार्थना मंडप ठेवण्यात आले आहे.

परदेशात बसूनही अंत्यदर्शन

 येत्या काळात परदेशातील नातेवाईकांनाही आपल्या प्रियजनांच्या अंत्यसंस्कारांच्या विधींमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार आहे, अशीही योजना यामध्ये आहे. अंत्यसंस्कारासाठी दिलेल्या प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार असून अंत्यदर्शनाचे हे क्षण परदेशातील नातेवाईकांनाही पाहता येतील अशी सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Development cemetery raising donations ysh

ताज्या बातम्या