महानगरपालिकेत अडीच वर्षे विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावलेले देवेंद्र आंबेरकर रविवारी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. काँग्रेसमधील अमराठी लोकांची हुकूमशाही व मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायामुळे शिवसेनेत जात असल्याची प्रतिक्रिया आंबेरकर यांनी दिली.

पाच वर्षांपूवी अंधेरी पश्चिम येथील आंबोली हिल मतदारसंघातून निवडून आलेले देवेंद्र आंबेरकर हे काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते होते. मात्र भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रवीण छेडा यांना दोन वर्षांपूर्वी विरोधी पक्षनेतेपद दिले गेले तेव्हा काँग्रेसच्या दोन गटातील धुसफुस बाहेर पडली. आंबेरकर यांना आगामी निवडणुकीत तिकीट देऊ नये यासाठी काँग्रेसमधील वरिष्ठ नेता प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. आंबेरकर आता शिवसेनेत प्रवेश करत असून रविवारी मातोश्रीवरून त्यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. संजय निरुपम यांची हुकूमशाही व मनमानी याला मी कंटाळलो होतो. काँग्रेसमध्ये मराठी माणसांवर अन्याय होत आहे, त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे देवेंद्र आंबेरकर यांनी सांगितले.