सध्या राजकारणात राज ठाकरे यांना कोणीच महत्त्व देत नाही. देशभरात नरेंद्र मोदी यांची प्रतिमा एवढी मोठी झाली आहे की त्यात सध्याचे कित्येक राजे-महाराजे वाहून गेले. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली टीका केवळ नैराश्यतून केली असल्याचे प्रदेश भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर दिल्ली तर सोडाच; महाराष्ट्रही मनसेसाठी आता दूर गेल्याने केवळ प्रसिद्धीचा झोत आपल्यावर पाडून घेण्यासाठीच केलेला हा ‘मनसे’ उद्योग असल्याची टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.
संपूर्ण देशाच्या प्रगतीचे व्हिजन सध्या नरेंद्र मोदी देशभर मांडत आहेत. अशावेळी गेल्या सात वर्षांत ज्यांना आपले व्हिजन (ब्लू प्रिंट) जाहीर करता आलेले नाही त्यांनी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा सल्ला देण्याची गरज नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. राज ठाकरे हे स्वत: गुजरातमध्ये गेले होते व त्यांनी मोदी यांच्या कामांचे तसेच गुजराच्या विकासाचे तोंडभरून कौतुक केले होते. मोदी केवळ गुजरातवर बोलत नाहीत तर देशातील विविध प्रश्नांवर बोलत आहेत. देशाचे प्रश्न सोडविण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सोडायला हवे हा सल्ला केवळ नैराश्यातून आला आहे.
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर तसेच अमिताभ बच्चन हे एखाद्या राज्याचे नाहीत तर देशाचे असल्याचे वेळोवेळी राज ठाकरे सांगतात. सरदार वल्लभभाई पटेल हेही साऱ्या देशाचेचे होते हेसुद्धा राज यांनी लक्षात ठेवावे, असेही फडणवीस म्हणाले.
देवेगौडा यांच्यासह काही पंतप्रधान मुख्यमंत्रीपदी होते. तर कोणताच अनुभव नसलेले राजीव गांधीही देशाचे थेट पंतप्रधान झाले, असे सांगून राज यांची टीका गैरलागू असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मोदी यांनी गुजरातमध्ये विकासाचे मॉडेल तयार केले व ते घेऊन ते देशभर जात असतील तर त्यात काहीही चूक नाही, असेही राऊत म्हणाले. गेल्या सात वर्षांत राज यांच्या पाटीवर बरेच काही लिहिले गेले आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनातील नौंटकीही आता बाहेर आली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना महाराष्ट्रातही स्थान राहाणार नाही, असे सेनेच्या एका नेत्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2014 रोजी प्रकाशित
राज यांची टीका नैराश्यातून-फडणवीस
सध्या राजकारणात राज ठाकरे यांना कोणीच महत्त्व देत नाही. देशभरात नरेंद्र मोदी यांची प्रतिमा एवढी मोठी झाली आहे की त्यात सध्याचे कित्येक राजे-महाराजे वाहून गेले.

First published on: 10-01-2014 at 03:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadanvis criticized raj thackeray