शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत या युतीची कारणं सांगितली आहेत. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटतं जनतेला हे समजतं. प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाही. आता त्यांना असं वाटतं की शिवसेना बरोबर आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं आपल्याबरोबर येतील. मात्र, त्यांना माहिती नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली आहे.”

“हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली”

“हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली, कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. त्यामुळे हिंदुत्ववादी मतं शिवसेनेबरोबर कशी राहतील? त्यामुळे या युतीमुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही. त्यांनी युती केली आहे, तर निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो हे बघुयात,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : “मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव”, फडणवीसांच्या आरोपावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात खूप अंतर”

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे-आंबेडकर युतीचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा केला. ते म्हणाले, “या युतीने फार परिणाम होईल, असं मला वाटत नाही. याचं कारण म्हणजे ही आघाडी केवळ भाजपाला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात खूप अंतर आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं तेव्हा भाजपाने त्याला पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता.”

हेही वाचा : “भाजपाच्या ‘बी’ टीमशी हात मिळवणाऱ्या प्रकाश आंबडेकरांनी शुद्धीवर येऊन बोलावं” विद्या चव्हाण म्हणाल्या, “शरद पवार भाजपाचे असते..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेनेने सर्व प्रकारचं आरक्षण रद्द करण्याची मागणी केली”

“मंडल आयोग आला तेव्हा भाजपाने आरक्षणाचं समर्थन केलं, मात्र शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर करावं अशाप्रकारची शिवसेनेची सातत्याने मागणी राहिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरपीआयची आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याच्याविरोधात शिवसेनेची भूमिका आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : Photos : शिवसेनेतील बंडखोरी, काही लोकांची बेईमानी ते एकनाथ शिंदेंची हिंमत, मोदींसमोरील फडणवीसांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

“नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागलं”

“अशा नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागतं. याचा अर्थ भाजपाला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहे,” असा टोलाही फडणवीसांनी ठाकरे-आंबेडकरांना लगावला.