Devendra Fadnavis On Bandra Fort Alcohol Party: मुंबईमधील वांद्रे येथील किल्ल्यावर दारुपार्टी सुरू असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर शेअर करत काही सवाल उपस्थित केले आहेत. तसेच ऐतिहासिक वास्तूमध्ये दारू पार्टी करण्याची परवानगी कशी दिली जाते? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

वांद्रे किल्ल्यावर दारुपार्टीच्या व्हिडीओबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या घटनेचा व्हिडीओ मी पाहिलेला नाही. पण मला काही लोकांनी याबाबत सांगितलं. जर अशा प्रकारे पार्टीसाठी परवानगी दिली गेली असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल.”

विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं?

“हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूपार्टीसाठी परवानगी कशी दिली जाते? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावरून वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली आहे.

काय आहे अखिल चित्रे यांची पोस्ट?

“महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिका परवानगी देतेच कशी? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे… हेच महाराष्ट्र भाजपाचं काम आहे. भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती”, अशी पोस्ट करत अखिल चित्रे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.